जिल्ह्यातील कर्मचारी संपात, शासकीय कार्यालये ओस
By Admin | Updated: September 3, 2015 02:03 IST2015-09-03T02:03:50+5:302015-09-03T02:03:50+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील कर्मचारी संपात, शासकीय कार्यालये ओस
देशव्यापी संप : ५० विविध संघटनांचा सहभाग, कामकाज ठप्प
यवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. जिल्ह्यातील विविध ५० संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले होते. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. जिल्हा मुख्यालयी शासकीय कामानिमित्ताने आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना संपामुळे कामाविनाच परत जावे लागले. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ केला. हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने जाऊन पुन्हा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यावेळी एलआयसी चौकात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कर्मचारी नेत्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवावे, कामगार कायद्यातील कामगार हिताची कलमे काढू नये, रेल्वे व संरक्षण सेवांचे खासगीकरण करू नये, कंत्राटी कामगार भरती बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी नेमावे, अंशदायी पेन्शन योजना बंद करून सरसकट सर्वांनाच जुनी पेन्शन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे निमंत्रक रवींद्र देशमुख, पेन्शनर्स असोसिएशनचे गोपाळकृष्ण देशपांडे, मंगेश वैद्य, नंदू बुटे, जिल्हा ग्राहक सेवा संघटनेचे विजय देशमुख, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे पी.पी. घाडगे, विजय ठाकरे, ग्रामसेवक संघटनेचे एस.के. जाधव, एम.डी. मस्के, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे यांनी केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या देशव्यापी संपात राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे बँकांचे कामकाजही ठप्प झाले होते. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. विविध फलक हातात घेतलेले कर्मचारी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. (शहर वार्ताहर)