वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:12 IST2017-09-05T23:11:31+5:302017-09-05T23:12:05+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे.

वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. ८ सप्टेंबर २००६ नंतरच्या शेतकरी, घरगुती आणि लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती वीज ग्राहक संघटनेने दिली आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ‘आकरांची अनुसूची’ जाहीर आणि लागू केल्यापासून लघुदाब व उच्चदाब ग्राहकांकडून सर्वीस लाईन व मीटरचे शुल्क घेण्याचा महावितरणचा हक्क संपला आहे. तरीही बेकायदेशीररित्या यासाठी रक्कम वसूल केली गेली. यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने याचिका दाखल केली. बेकायदेशीररित्या आकारलेल्या रकमा परत करण्याचे आदेश १७ मे २००८ रोजी नियामक आयोगाने दिले. महावितरण कंपनी अपिलात गेल्याने न्यायालयाने परतावा करण्यास मनाई केली होती. या दाव्याचा अंतिम निकाल देताना १० नोव्हेंबर २०१६ च्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महावितरणचे अपिल फेटाळले. त्यामुळे आता २००६ नंतरच्या वीज ग्राहकांना भरलेली अथवा खर्च केलेली रक्कम सव्याज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
नमुना अर्ज आणि अधिक माहितीसाठी वीज ग्राहक संघटना कार्यालय, गोधणी रोड यवतमाळ येथे संपर्क करावा, असे विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी म्हटले आहे.
आर्थिक स्थिती खालावल्याने चार्जेस
महावितरणची म्हणजे पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची आर्थिक स्थिती खालावू लागल्याने मंडळाने १९९० मध्ये सर्वीस लाईन चार्जेस निश्चित करून आकारणी सुरू केली. वीज जोडणी देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधांसाठीचा (पोल्स, लाईन आदी) खर्च निश्चित केला. आकारांची अनुसूची निश्चित करताना सर्व ग्राहकांवरील हा आकार पूर्णपणे रद्द केला. त्याचबरोबर मीटर कंपनीने स्वखर्चाने लावायचे, कोणत्याही ग्राहकाकडून मीटरची किंमत घेता येणार नाही, असेही आदेश दिले. तरीही अनेक ग्राहकांवर हा भुर्दंड बसविण्यात आला होता. आता ही रक्कम संबंधित ग्राहकांना परत मिळणार असल्याचे प्रशांत दर्यापूरकर यांनी सांगितले.