वीज तारांच्या स्पर्शाने बैल ठार
By Admin | Updated: October 9, 2016 00:18 IST2016-10-09T00:18:52+5:302016-10-09T00:18:52+5:30
जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने ९० हजार रुपये किमतीचा बैल ठार झाल्याची घटना राळेगाव शिवारात घडली.

वीज तारांच्या स्पर्शाने बैल ठार
राळेगाव : जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने ९० हजार रुपये किमतीचा बैल ठार झाल्याची घटना राळेगाव शिवारात घडली. राजेश तुकाराम नाकतोडे यांच्या मालकीचा हा बैल होता. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी देवळी येथील बाजारातून विकत घेतला होता.
बैलबंडी घेऊन शेतात जात असताना वाढलेल्या गवतात दबून असलेली तार दिसली नाही. बंडीला जुंपलेल्या एका बैलाचा यात तारेला स्पर्श झाला. बैल खाली कोसळल्याने सावधता बाळगून शेतकऱ्याने बाजूला उडी घेतली आणि कासरा कापून दुसरा बैल मोकळा केला. मात्र एक बैल ठार झाल्याने त्यांचे नुकसान झाले. संबंधितांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
विद्युत कंपनीच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. तुटलेल्या आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघात होत आहेत. संबंधितांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जाते. या प्रकारात नागरिकांचे मात्र नुकसान होत आहे. विद्युत कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही हा विषय गांभीर्याने घेत नाही. राळेगाव शिवारात घडलेल्या घटनेतून ही बाब प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे नागरिकांत मात्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)