निलंबन कारवाईच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार
By Admin | Updated: May 6, 2015 01:51 IST2015-05-06T01:51:31+5:302015-05-06T01:51:31+5:30
शेतकऱ्यांच्या मृत्यूचा ठपका ठेवत वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यासह दोघांवर सोमवारी करण्यात आलेल्या ...

निलंबन कारवाईच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मृत्यूचा ठपका ठेवत वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यासह दोघांवर सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उचलले. निलंबनाची कारवाई मागे घेतली नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.
बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूर येथील शेतकरी अमरलाल मनियार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वीज वितरणने केलेल्या आकसपूर्ण कारवाईमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे, उपकार्यकारी अभियंता संजय कांबळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. ही कारवाई मागे घेण्याची मागणी करीत मंगळवारी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, क्षेत्रीय तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कामगार संघटना, इंटक युनियन आणि वर्कर्स फेडरेशन युनियन, महाराष्ट्र नवनिर्वान सेना, अधिकारी संघटना, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या नेतृत्वात कृती समिती तयार करण्यात आली. या समितीच्या नेतृत्वात कर्मचारी आंदोलन करीत आहे. तीनही अभियंत्यावर कोणत्याही प्रकारचे फौजदारी गुन्हे नाही. कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई नाही, पोलीस चौकशी नाही, असे असताना या तिघांवर कारवाई करण्यात आली. या तिघांचेही निलंबन मागे घेण्यासाठी कृती समितीने सभा घेऊन अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात ठिय्या दिला.
निलंबन मागे न घेतल्यास ६ मे रोजी घटनेचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून काम केले जाईल. ७ मेपासून काम बंद आंदोलन केले जाणार आहे. या द्वारसभेला सहायक अतिरिक्त कार्यकारी अभियंते, ३० उपकार्यकारी अभियंते, २५ सहायक अभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले. (शहर वार्ताहर)