८८ कोटींचे विद्युत कंत्राट पुण्याला
By Admin | Updated: December 18, 2014 23:01 IST2014-12-18T23:01:44+5:302014-12-18T23:01:44+5:30
वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांंच्या उभारणीसाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता ८८ कोटी रुपयांचे कंत्राट पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान या कंपनीने येथील एका हॉटेलमध्ये या संंबंधीची बैठक

८८ कोटींचे विद्युत कंत्राट पुण्याला
पायाभूत सुविधा : पॉश हॉटेलमध्ये बैठक, वीज अभियंते उपस्थित, वितरणची सारवासारव
यवतमाळ : वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांंच्या उभारणीसाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता ८८ कोटी रुपयांचे कंत्राट पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान या कंपनीने येथील एका हॉटेलमध्ये या संंबंधीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वीज अभियंत्यांनीही शासनाचे नियम धुडकावून हजेरी लावल्याने सलोख्याचे संबंध उघड होत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सहा हजार कोटी रुपयांची इन्फ्रा-२ ही योजना जाहीर करण्यात आली. तत्कालीन ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला. सदर योजनेतून यवतमाळ जिल्ह्याला सुमारे ८८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून जिल्ह्यात विजेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यातून वीज वाहिन्या, वीज उपकेंद्र, कृषीपंप वाहिनी या सारख्या सुविधांची उभारणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा हा ८८ कोटींचा कंत्राट स्पेस एज या कंपनीला मिळाला आहे. हा कंत्राट १७ टक्के जादा दराने दिला गेल्याचे सांगण्यात येते. विशेष असे संपूर्ण इन्फ्रा - २ मधील सहा हजार कोटी रुपयांच्या कंत्राटाचे नियोजन व बाटप वीज महावितरण कंपनीच्या मुंबई मुख्यालयातूनच करण्यात आले. त्यातूनच यवतमाळ जिल्ह्यासाठी स्पेस एज या एजंसीची नियुक्ती झाली.
दरम्यान गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची दारव्हा रोड स्थित पॉश हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला वितरण कंपनीच्या अकोला येथील मुख्य अभियंता कार्यालयातून अधीक्षक अभियंता सा.ही. खांडेकर (इन्फ्रा) तसेच यवतमाळचे वीज अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य कार्यकारी, उप व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. शासनाच्या कोणत्याही बैठका हॉटेलमध्ये आयोजित करू नये, कार्यालयातच घेतल्या जाव्या असे निर्देश आहेत. मात्र या निर्देशांकडे डोळेझाक करून अभियंत्यांनी हजेरी लावल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले. या बैठकीसाठी मुख्य अभियंता संजय ताकसांडे हेसुद्धा उपस्थित राहणार होते, असे सांगितले जाते. मात्र या बैठकीची माध्यमांना कुणकुण लागताच वीज अभियंत्यांनी सारवासारव केली. ताकसांडे यांना मूर्तीजापुरातच थांबविण्यात आले. दरम्यान वितरण कंपनीच्या अकोला परिमंडल कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हॉटेलमधील ही बैठक कंत्राटदार कंपनीने नियोजनासाठी आयोजित केली होती. त्याला मार्गदर्शक म्हणून वीज अभियंत्यांनी उपस्थिती लावल्याचे नमूद केले आहे. या बैठकीवर वितरणने कोणताही खर्च केला नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)