विजेचा अपव्यय
By Admin | Updated: October 18, 2014 23:02 IST2014-10-18T23:02:00+5:302014-10-18T23:02:00+5:30
नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

विजेचा अपव्यय
दुर्लक्ष : नगरपरिषद व ग्रामपंचायतीही उदासीन
यवतमाळ : नागरिकांना एकीकडे भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठ्याला तोड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे दिवसाही सुरू राहणाऱ्या दिव्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनला विद्युत कंपनी, ग्रामपंचायती आणि नगर पालिकांकडूनच मूठमाती दिली जात आहे.
यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे दिवसाही सुरू राहतात. गेली कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एखाद्या खांबावरील दिवा नादुरूस्त झाला तरच तो बंद असतो. याप्रकारात विजेचा अपव्यय होत आहे. शहराच्या काही भागात तासनतासाचे भारनियमन केले जाते. याशिवाय काही भागामध्ये विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. नागरिकांना नियमित विजेला मुकावे लागत असताना होणारा विजेचा अपव्यय संताप निर्माण करणार आहे.
लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या अनेक भागातील पथदिवे कधीच बंद राहत नाही दिवसाही ते प्रकाश देतात. याप्रकाराविषयी संबंधित ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी वीज बचतीविषयी किती दक्ष आहे, हे दिसून येते.
यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या काही भागातही हा प्रकार सुरू आहे. पथदिवे सतत सुरू राहण्याविषयीचा प्रश्न निकाली काढल्या जात नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे. विजेचे अवास्तव येणारे बिल भरताना वीज ग्राहकांना नाकीनऊ येत आहे. सरासरी बिल पाचवीलाच पुजले आहे. आता नवीन मीटर लावण्याचे काम विद्युत कंपनीने हाती घेतले आहे. यातून वीज बिलांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
लोहारा विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या भागांमध्ये दिवसाही पथदिवे सुरू राहण्याची समस्या मोठी आहे. शिवाय वीज चोरीही कमालीची वाढली आहे. वीज बचतीच्या शासनाच्या आवाहनाला या कार्यालयाकडून कुठलाही थारा नाही. त्यामुळे वरिष्ठांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)