राजकीय दबावात बनली नगरपरिषद मतदार यादी

By Admin | Updated: October 9, 2016 00:07 IST2016-10-09T00:07:58+5:302016-10-09T00:07:58+5:30

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

Electoral rolls of municipal council formed in political pressure | राजकीय दबावात बनली नगरपरिषद मतदार यादी

राजकीय दबावात बनली नगरपरिषद मतदार यादी

हजारांवर आक्षेप : शहराबाहेरील नावांचाच भरणा अधिक 
यवतमाळ : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी राजकीय दबावात तयार केल्याचा आक्षेप अनेकांनी नोंदविला. यामध्ये शहराबाहेरच्या मतदारांचीच नावे नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे आक्षेप घेण्यासाठी नगरपरिषदेने त्यांच्या सोईचे फॉर्मेट ठरवून दिले. यावर तक्रारकर्त्यांनी संताप व्यक्त करून असा कुठलाही नियम नाही म्हणत हजरांवर आक्षेप दाखल केले आहे.
प्रारुप मतदार यादीवरील आक्षेप निकाली काढून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया नगरपरिषदेत सीओंच्या अधिकारातच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीत सत्ताधाऱ्यांकडून ढवळाढवळ करण्यात आल्याचा थेट आरोप होत आहे. शहरात २८ प्रभाग असून त्यातून ५६ उमेदवार निवडायचे आहेत. प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ३३ हजार ६०५ मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदार यादीचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर २६ सप्टेंबरपासून आक्षेप मागविण्यात आले होते. सुरूवातीला आक्षेपासाठी कुठल्याही फॉर्मेटची सक्ती करण्यात आली नाही. मात्र जसजसा आक्षेपांचा ओघ वाढला, तशा मतदार यादीतील चुका प्रखरपणे मांडण्यात येऊ लागल्या. त्यानंतर मात्र सावरुन घेण्यासाठी ठराविक फॉर्मेटमध्येच आक्षेप घ्यावा, अशी सक्ती करण्यात आली.
शेवटच्या दिवशी तर आक्षेप नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेत गर्दी जमली होती. यात आजी-माजी नगरसेवकांचा समावेश होता. आक्षेप घेण्यासाठी कुठलेही ठराविक फॉर्मेट असावे, असा नियम नाही. त्यामुळे आम्ही देईल त्या पद्धतीचे आक्षेप स्वीकारावे लागतील, असा आग्रह करण्यात आला. त्यानंतर पालिका प्रशासनाला नमते घेऊन आलेले आक्षेप स्वीकारावे लागले. गुरुवारपर्यंत मतदार यादीच्या प्रारुपावर एक हजार आक्षेप प्राप्त झाले होते. शेवटच्या दिवशी आलेल्या आक्षेपांची वृत्तलिहीपर्यंत जुळवाजुळव झालीच नव्हती. त्यामुळे शेवटच्या दिवशी किती आक्षेप आले, हा आकडा मिळू शकला नाही. अंतिम मतदार यादी १५ आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी दरम्यानच्या काळात या आक्षेपांवर सुनावणी होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

सोईची नावे केली समाविष्ट
मतदार नोंदणी कार्यक्रम राबविताना राजकीय दबावात मतदार यादीत सोईची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागबाहेरच्या व्यक्तींचे नावही या यादींमध्ये आहे. इतकेच नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची नावे यादीत दिसून येतात. यावरच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. निवडणुकीचे गणित जुळविण्यासाठी बाहेरचे मतदार नोंदविण्याचे काम इच्छुक उमेदवारांकडून केले जाते. आता या नावांना प्रारुप यादीतून वगळण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. शिवाय प्रभागाबाहेर मतदान असलेल्या नागरिकांचेही नाव त्याच प्रभागातील मतदान केंद्राच्या यादीत समाविष्ट केले जाते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुठलाही दबाव आलेला नाही. या प्रारुप याद्या असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याची व्यवस्था आहे. आक्षेपाप्रमाणे पुन्हा सर्व्हे करून योग्य फेरबदल केले जाणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
- सुदाम धुपे
मुख्याधिकारी, यवतमाळ

Web Title: Electoral rolls of municipal council formed in political pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.