यवतमाळमध्ये आठ नगर परिषदांच्या निवडणुका
By Admin | Updated: November 18, 2016 07:39 IST2016-11-18T07:39:26+5:302016-11-18T07:39:26+5:30
यवतमाळ जिल्ह्यात आठ नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत.

यवतमाळमध्ये आठ नगर परिषदांच्या निवडणुका
यवतमाळ : जिल्ह्यात आठ नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या वेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून दिला जाणार असल्याने, यवतमाळ व पुसदच्या लढतीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात दहा नगर परिषदा आहेत. त्यापैकी पांढरकवडा व नेर येथील निवडणुकांना अद्याप बराच अवधी आहे, तर यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड या नगर परिषदांमध्ये निवडणूक होत आहे.
पुसदमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक रिंगणात आहेत. यवतमाळात भाजपा नेते ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, तर दारव्हा, दिग्रसमध्ये महसूल राज्यमंत्री संजय राठोड, तसेच विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमरखेडमध्ये भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने व हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आहेत. आर्णीमध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, भाजपाचे आमदार राजू तोडसाम पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. वणीमध्ये मनसेने आव्हान उभे केले आहे. तेथे भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांची कसोटी लागणार आहे. घाटंजीमध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर निर्णायक ठरणार आहेत. तेथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शैलेश ठाकूर यांनी बंडखोरी केल्याने, पक्षातून हकालपट्टी केली आहे. (प्रतिनिधी)