सभापतिपदांसाठी चुरस वाढली
By Admin | Updated: March 6, 2017 01:21 IST2017-03-06T01:21:52+5:302017-03-06T01:21:52+5:30
जिल्ह्यातील १६ पंचायत समिती सभापतींसाठी चुरस वाढली आहे. येत्या १४ मार्चला निवड होत असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

सभापतिपदांसाठी चुरस वाढली
१४ मार्चला निवड : पंचायत समितीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी
यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समिती सभापतींसाठी चुरस वाढली आहे. येत्या १४ मार्चला निवड होत असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांपैकी पांढरकवडा, नेर, दारव्हा, कळंब, घाटंजी व बाभूळगाव या सहा पंचायत समितींचे चित्र स्पष्ट आहे. पांढरकवडा, नेर व दारव्हामध्ये शिवसेनेचा सभापती होईल. कळंबमध्ये काँग्रेस, तर बाभूळगाव आणि घाटंजीत भाजपाची सत्ता येईल. उर्वरित १० पंचायत समितींमध्ये सर्वच पक्षांना ‘जोडतोडी’चे राजकारण करावे लागणार आहे.
पुसद, महागावमध्ये राष्ट्रवादीला एका सदस्याची मदत लागणार आहे. उमरखेडमध्ये काँग्रेसला बहुमतासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांना सोबत घ्यावे लागेल. यवतमाळात शिवसेनेला, तर वणीत भाजपाला एका सदस्याची गरज आहे. मारेगावमध्ये काँग्रेसला, तर झरीत भाजपाला एका सदस्याची गरज आहे. आर्णीत काँग्रेसला, तर दिग्रसमध्ये शिवसेनेला एक सदस्य सोबत घ्यावा लागेल. या जुळवणीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जुळवाजुळव न झाल्यास ईश्वरचिठ्ठी
काही पंचायत समितींमध्ये आवश्यक सदस्यांची जुळवाजुळव न झाल्यास ईश्वरचिठ्ठीने सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे. राळेगाव पंचायत समितीत तर हमखास ईश्वरचिठ्ठी होणार आहे.
जिल्हा परिषदेची रंगीत तालीम
पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेची रंगीत तालीम ठरणार आहे. पंचायत समितीमधील घडामोडींवरून जिल्हा परिषदेत नेमकी कुणाची सत्ता येणार, याचा अदमास येणार आहे. सध्या मुंबईतील घडामोडींवरून अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मुंबईप्रमाणे येथे स्थिती झाल्यास काय करायचे, याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीत खल सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसने ११ मार्चला आपल्या जिल्हा परिषद सदस्यांची यवतमाळात बैठक बोलाविली आहे.