लोणी-जवळा सर्कलमध्ये निवडणुकीचे वारे
By Admin | Updated: May 12, 2014 00:16 IST2014-05-12T00:16:17+5:302014-05-12T00:16:17+5:30
जिल्हा परिषद सदस्य तसेच कॉंग्रेसचे गटनेते प्रताप राठोड यांच्या निधनाने लोणी-जवळा सर्कलमध्ये पोटनिवडणूक घेतली जात आहे.

लोणी-जवळा सर्कलमध्ये निवडणुकीचे वारे
यवतमाळ : जिल्हा परिषद सदस्य तसेच कॉंग्रेसचे गटनेते प्रताप राठोड यांच्या निधनाने लोणी-जवळा सर्कलमध्ये पोटनिवडणूक घेतली जात आहे. निवडणुकीसाठी येथे मतदारयादी कार्यक्रम राबविला जात आहे. जवळा-लोणी सर्कलला जिल्ह्याच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. या सर्कलमधून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी लढत दिली आहे. प्रताप राठोड यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर याच सर्कलमध्ये शिवसेनेचे माजी आमदार व जिल्ह्याचे नेते बाळासाहेब मुनगिनवार यांचा एक हाती पराभव केला होता. आता या सर्कलमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येथील इच्छुकांनी निवडणूक मतदारयादी कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच चाचपणी सुरू केली होती. लोणीपासून बोरगाव दाभडीपर्यंत विस्तारलेल्या या सर्कलमध्ये अनेक दिग्गजांना पराभव पत्करावे लागल्याचाही अनुभव आहे. या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना यांच्याकडून स्वतंत्र उमेदवार उतरविण्याची शक्यता आहे. यासोबतच कॉंग्रेस-राष्टÑवादीतही नेमकी कुठली खेळी होते, यावरूनच येथील समिकरण ठरणार आहे. प्रताप राठोड यांचे लहान बंधू अजित राठोड यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी समर्थकाकडून होत आहे. मात्र याबाबत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. आर्णी पंचायत समिती सभापतीकडूनही ही निवडणूक लढण्याची जाहीर वाच्यता केली जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर या सर्कलमधील राजकीय गणिताची जुळवाजुळव स्पष्ट होणार आहे. दादा गटाला येथे मागील निवडणुकीत हार पत्करावी लागली होती. आता त्यांच्याकडूनही हा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सर्व सूत्र सुरळीत चालल्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांचे ज्येष्ठ बंधू येथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबाबत अधिकृत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. २० मेपर्यंत येथील मतदार याद्या प्रसिद्ध होईल. त्यावर आक्षेप मागविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदार याद्यांचा संदर्भ घेतला जाणार आहे. मतदार यादी कार्यक्रम आटोपताच जूनच्या पहिल्या आठवड्यात येथील निवडणूक घेण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)