‘वसंत’ची निवडणूक लवकरच

By Admin | Updated: January 30, 2016 02:45 IST2016-01-30T02:45:57+5:302016-01-30T02:45:57+5:30

वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत जुलै महिन्यातच होणार होती. परंतु या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली.

Election of 'Vasant' soon | ‘वसंत’ची निवडणूक लवकरच

‘वसंत’ची निवडणूक लवकरच

याचिका मागे : ४ फेब्रुवारीला होणार सुनावणी
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत जुलै महिन्यातच होणार होती. परंतु या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. आता याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली असून ४ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे वसंतची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ गोठविण्यात आल्याने कारखान्याचे संचालक रणजित नलावडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जून महिन्यात ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबली होती. संपूर्ण विदर्भातील सहकारी तत्वावर चालणारा हा एकमेव कारखाना होय. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना आर्थिक डबघाईस आला आहे. थकीत वेतनामुळे कामगारही वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेत आहे. तर ऊस उत्पादकही थकीत बिलासाठी आंदोलने करीत आहे. वसंत संचालक मंडळ आणि शेतकरी-कामगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या इतिहासात कधी नव्हे तेवढे वाद प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कार्यकाळात झाला आहे. अनेकदा वाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले आहे. सध्याही कारखाना प्रशासन आणि कामगारात पाहिजे तसा समन्वय दिसत नाही. त्यातच यंदा गळीत हंगामही खूप उशिरा सुरू झाला. परिणामी इतर कारखान्यांनी वसंतचा ऊस पळविला आहे. या ना त्या कारणाने साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशा या कारखान्याची निवडणूक जुलै २०१५ मध्ये होणार होती. परंतु ९७ घटना दुरुस्तीनुसार कारखान्यातील आर्थिक दुर्बल घटकमधून निवडून येणाऱ्या संचालकाचा मतदारसंघच गोठविण्यात आला होता. त्यामुळे रणजित नलावडे यांनी जून महिन्यात याचिका दाखल केली. परिणामी निवडणूक लांबणीवर पडली.
उमरखेड, पुसद, महागाव, हिमायतनगर, हदगाव या पाच तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांंना आपल्या हालचाली थांबविण्याची वेळ आली होती. परंतु याचिकाकर्ते रणजित नलावडे यांनी ही याचिका मागे घेण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आता वसंत कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Election of 'Vasant' soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.