५०८ ग्रामपंचायतींची दुसऱ्या टप्प्यात निवडणूक
By Admin | Updated: May 6, 2015 01:50 IST2015-05-06T01:50:07+5:302015-05-06T01:50:07+5:30
पहिल्या टप्प्यातील ४८३ ग्रामपंचायती निवडणुका पार पडताच प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी चालविली आहे.

५०८ ग्रामपंचायतींची दुसऱ्या टप्प्यात निवडणूक
यवतमाळ : पहिल्या टप्प्यातील ४८३ ग्रामपंचायती निवडणुका पार पडताच प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी चालविली आहे. ५०८ ग्रामपंचायतीची निवडणूक जून, जुलै महिन्यात होणार असून त्या अनुषंगाने बुधवारी आढावा बैठक आयोजित आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती किती आहे, याची विचारणा करण्यात आली आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. लवकरच जिल्ह्यातील ५०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असून पुन्हा गावागावामध्ये निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.
सरपंच निवडीला
पोलीस संरक्षण
पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील सरपंच पदाची निवड ६ मेपासून होत आहे. यवतमाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ६ मे रोजी होणार आहे. ११ मेपर्यंत इतर तालुक्यातील सरपंचाची निवड केली जाईल.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. तहसीलदार, अव्वल कारकून आणि मंडळ अधिकाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच पदाच्या निवडीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. (शहर वार्ताहर)