जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक नोव्हेंबरअखेर
By Admin | Updated: September 29, 2014 23:11 IST2014-09-29T23:11:59+5:302014-09-29T23:11:59+5:30
वार्षिक २ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी

जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक नोव्हेंबरअखेर
नवी रचना : सात जागांची कपात, तीन मतदारसंघ गोठविले
यवतमाळ : वार्षिक २ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी होताच जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वातील २८ सदस्यीय संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१२ ला संपली. परंतु त्यानंतर शासनाकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना मुदतवाढी मिळत गेल्या. आतापर्यंत या संचालक मंडळाचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. लोकसभा व विधानसभेमुळे बँकेची निवडणूक लांबली. परंतु ती आता नोव्हेंबर अखेरीस घेतली जाणार आहे.
विशेष असे जिल्हा बँकेची संचालक मंडळाची निवडणूक ही सहकार कायद्यातील नव्या तरतुदी व नव्या रचनेनुसार होणार आहे. बँकेचे सध्या २८ संचालक आहेत. परंतु नव्या रचनेत ही मर्यादा २१ ठेवण्यात आली आहे. अर्थात संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. जुन्या रचनेतील वैयक्तिक, पगारदार आणि डेअरी हे तीन मतदारसंघ गोठविण्यात आले आहे. अनुक्रमे विजय माने, डॉ. रवींद्र देशमुख, अॅड. अनिरुद्ध लोणकर हे या गोठविलेल्या मतदारसंघांचे विद्यमान संचालक आहे. आता नव्या रचनेत वैयक्तिक पगारदार, डेअरी, जिनिंग-प्रेसिंग, मच्छीमार, मार्केटिंग अशा विविध मतदारसंघांचा एकच संयुक्त मतदारसंघ बनविण्यात आला आहे. त्यातून तीन संचालक निवडून दिले जाणार आहे. या संयुक्त मतदारसंघात सर्वाधिक मते मिळविणाऱ्या तिघांना (तीन टॉपर) संचालक म्हणून घोषित केले जाईल. नव्या रचनेत पाच जागा आरक्षित आहे. त्यातील दोन महिलांसाठी असतील. तर १४ संचालक हे तालुकास्तरावरून निवडून येणार आहे. जुन्या रचनेत महिलांसाठी तीन जागा होत्या. मात्र नव्या रचनेत ही जागा एक ने कमी करण्यात आली.
बँक निवडणुक पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होत होत्या. परंतु सहकार खात्याने आता या निवडणुकांसाठी पुण्यात स्वतंत्र इलेक्शन कमिश्नर हे पद व विभाग निर्माण केला आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या सहायाने व इलेक्शन कमिश्नर प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या पुढील निवडणुका होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)