नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला
By Admin | Updated: October 25, 2015 02:26 IST2015-10-25T02:26:34+5:302015-10-25T02:26:34+5:30
राळेगावात रणधुमाळी : रिंगणातील उमेदवारांना वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराची प्रतीक्षा

नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला
नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला
राळेगावात रणधुमाळी : रिंगणातील उमेदवारांना वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराची प्रतीक्षा
अशोक पिंपरे राळेगाव
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षाचे व अपक्ष बंडखोर या खास व आम उमेदवाराच्या सहभागामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत चढली आहे. दिवाळीचे फटाके ११ नोव्हेंबर रोजी फुटणार आहे. तत्पूर्वी २ नोव्हेंबर रोजी १७ उमेदवारांकडे फटाके फुटणार आहे, तर उर्वरित १०७ उमेदवारांचे बारा वाजणार आहे.
निवडणुकीत विविध राजकीय भूमिका बजावलेले मान्यवर, विविध क्षेत्रात, व्यवसायात कार्यरत मान्यवर, एकाच कुटुंबातील अनेक सदस्य रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीमुळे अनेकांना वेळेवर आपला मूळ पक्ष सोडून तिकिटासाठी इतर पक्ष धरावा लागला, तर काहींना बंडखोरी करावी लागली. राजकीय पक्ष तिकीट देत नाही म्हणून अनेकांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली.
माजी सरपंच सुधाकर गेडाम, गीता हिकरे, संजीवनी लोहे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबन भोंगारे, राळेगाव सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंगजी हुरकुंडे मैदानात आहेत. राष्ट्रवादीतर्फे संजय दुरबुडे, तर त्याच पक्षाकडून प्रज्वला राजेंद्र दुरबुडे या एकाच कुटुंबातील व्यक्तींची दोन प्रभागात उमेदवारी आहे. पांडुरंग हिकरे आणि गीता हिकरे राष्ट्रवादीकडून लढत देत आहे. कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक रिंगणात आहे.
भाजपने जिल्हा सरचिटणीस व राळेगाव विधानसभा प्रमुख अॅड. प्रफुल्ल चव्हाण, तालुका सरचिटणीस भालचंद्र कवीश्वर, शहर अध्यक्ष अभिजित कदम यांनी टीम उतरविली आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतीक बोबडे यांना तिकीट मिळूनही त्यांनी व अशोक उजवणे यांनी माघार घेत सर्वांना चकित केले. भाजपाचे दलीप हिवरकर यांनी पक्ष सोडून राकाँची तिकीट मिळविली, तर शीतल कोकुलवार यांनी भाजप सोडून सेनेचे तिकीट मिळविले.
भाजपकडून अनेक जागांवर काँग्रेसमधून वेळेवर आलेले उमेदवार निवडणूक लढवित आहे. काँग्रेसपुढे अनेक प्रभागात बंडखोरीमुळे आव्हान उभे झाले आहे. भाविकांना तीर्थाटन करून आणून आशीर्वाद देणारे महाराज स्वत: मतदारांचे आशीर्वाद घरोघरी जाऊन घेत आहे. हभप पद्माकर ठाकरे महाराज हे सेनेतर्फे लढत देत आहे.
अनेक उमेदवारांना आरक्षणाचा फटका बसला आहे. गृह प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागली आहे, तर पक्षांना योग्य उमेदवार न सापडल्याने ऐन वेळेवर आलेल्या उमेदवारांनाही पक्षाची तिकीट देऊन कामी लावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक असली तरी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रतिमेचा आणि नावाचा वापर निवडणूक प्रचारात, प्रचार सामुग्रीत पुरेपूर केला आहे.
मतदानास आता शेवटचा आठवडा शिल्लक राहिला असताना स्टार प्रचारक, बड्या नेत्यांच्या प्रचार सभा नावालाही झालेल्या नाहीत. शेवटच्या दिवसात त्या घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.