आठ दरोडेखोरांना नागपुरातून अटक

By Admin | Updated: October 3, 2016 00:10 IST2016-10-03T00:10:14+5:302016-10-03T00:10:14+5:30

भरदिवसा येथील सेमिनरी ले-आऊटमध्ये सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आठ दरोडेखोरांना शहर पोलिसांनी नागपुरात रविवारी पहाटे अटक केली.

Eight robbers were arrested from Nagpur | आठ दरोडेखोरांना नागपुरातून अटक

आठ दरोडेखोरांना नागपुरातून अटक

सेमिनरी ले-आऊट : शहर पोलिसांच्या शोधपथकाची कारवाई
यवतमाळ : भरदिवसा येथील सेमिनरी ले-आऊटमध्ये सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आठ दरोडेखोरांना शहर पोलिसांनी नागपुरात रविवारी पहाटे अटक केली. मंगळवारी पडलेल्या दरोड्यात वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले. सीसीटीव्ही फुटेज आणि एका कॅरिबॅगने या दरोडेखोरांचे बिंग फोडले.
येथील सेमिनरी ले-आऊटमधील धान्य व्यापारी अनिल खिवंसरा यांच्याकडे मंगळवार २७ सप्टेंबर रोजी भरदुपारी दरोडा पडला होता. घर मालकीन आणि मोलकरणीला बांधून शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकला होता. यामुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या दरोड्याचा तपास सुरू केला. अवघ्या पाच दिवसात या दरोड्याचा छडा लावून दरोडेखोरांना जेरबंद केले. घटनेपासूनच शहर ठाण्याचे शोध पथक दरोडेखोरांच्या मागावर होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत माग काढला. त्यावरून दरोडेखोर नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. शहर ठाण्याच्या शोधपथकाने रविवारी पहाटे दरोडेखोरांना जेरबंद केले. त्यात प्रणय ऊर्फ सोनू परमानंद राहुले (३१) रा.प्लॉट नं. ४४ लष्करी बाग नागपूर, सचिन ऊर्फ मनीष रवी गावंडे (३४) रा.सुगतनगर म्हाडा कॉलनी नागपूर, अंकित ऊर्फ बबलू शिवानंद मिश्रा (३५) रा.धम्मानंदनगर नागपूर, कुणाल ऊर्फ मोनू प्रकाश रामटेके रा.कमाल चौक लष्करी बाग नागपूर, त्रिलोक पांडुरंग पाटील रा.लष्करी बाग कोष्टीपुरा नागपूर, देवेंद्र जयदेव खापरे रा.नरसाळा कीर्तीधर ले-आऊट नागपूर, संदीप तुळशीराम उमरेडकर रा.गांधी बाग नागपूर, तौसिन अहमद ऊर्फ शेरू सगीर अहमद (२६) रा.कामगारनगर पहिली गल्ली जरीपटका नागपूर या दरोडेखोरांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप आणि शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शोधपथकाचे फौजदार मंगेश भोयर यांच्या चमूने नागपुरातील जरीपटका परिसर तीन दिवसांपासून पिंजून काढला. या कारवाईत नागपूर मुख्यालयातील शिपाई प्रवीण जांभुळकर याच्या मदतीने सुधीर पिदूरकर, राजेश वानखडे, नीलेश भुसे, नितीन पंचबुद्धे, महेश मांगुळकर यांनी दरोडेखोरांना जेरबंद केले. या दरोड्यात १५ च्यावर दरोडेखोर सहभागी असण्याचा संशय पोलिसांना आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

विसरलेल्या कॅरीबॅग व वाहनाने फोडले बिंग
४दरोडेखोर खिवंसरा यांच्या घरी एअरगन असलेली कॅरीबॅग विसरून गेले. शोधपथकाने या कॅरीबॅगलाच मुख्य सुगावा मानून नागपूरकडे तपास केंद्रित केला. कॅरीबॅगवर जरीपटका येथील एका क्लॉथ सेंटरचे नाव होते. एवढ्या सुगाव्यावरूनच शोधपथक नागपूरकडे रवाना झाले. जाताना नागपूर मार्गावरील कळंब, वर्धा, देवळी, शेलू येथे महामार्गावर असलेल्या सर्वची सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. घटनास्थळापासून संशयास्पदरित्या पसार झालेल्या लाल रंगाची कॉलिस गाडीचा (एम.एच.३१/ए.जी.७९७०) शोध सुरू केला. यावरुन कारवाई करीत दरोडेखोरांना जेरबंद केले.

मोलकरणीवर पोलिसांचा संशय
थेट नागपुरातून येऊन दरोडा टाकणे शक्य नाही. दरोडेखोरांना स्थानिकांची मदत मिळाल्याचा संशय पोलिसांंना सुरुवातीपासून होता. आता आरोपी अटक झाल्यानंतर पोलीस टीप देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या मोलकरणीवरच प्रथमदर्शनी पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेत दोन महिला संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्या दोघींवरही पोलिसांचे लक्ष केंद्रीत असून अटकेची कारवाई करण्यासाठी दरोडेखोरांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात या प्रकरणात टीप देणारेही पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, असे सांगण्यात आले.

Web Title: Eight robbers were arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.