इस्टेट ब्रोकरकडे आठ लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 18, 2015 01:58 IST2015-06-18T01:58:34+5:302015-06-18T01:58:34+5:30

रियल इस्टेट ब्रोकरचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. वडगाव

Eight Brokers Around Rs | इस्टेट ब्रोकरकडे आठ लाखांची घरफोडी

इस्टेट ब्रोकरकडे आठ लाखांची घरफोडी

बोरेले ले-आऊट : चोऱ्या वाढल्या, भीतीचे सावट, नागरिकांनो, सतर्कता बाळगा
यवतमाळ : रियल इस्टेट ब्रोकरचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. वडगाव रोड पोलिसांच्या रात्रगस्तीला आव्हान देणारी ही घटना रात्री बोरेले ले-आऊटमध्ये घडली.
राजू अर्जुनराव खंडाळकर असे या ब्रोकरचे नाव आहे. रात्री १.३० वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. मेन गेटवरून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. ते मागच्या बाजूने बेडरुमकडे पोहोचले. तेथे खिडकीत लावलेला कुलर बाजूला काढून ठेऊन त्यांनी ग्रील तोडली. त्यातून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाट फोडले. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून बेडरुमचा दरवाजा आतून बंद केला आणि त्याला गाद्या लावण्यात आल्या. कपाटातून चोरट्यांनी सात लाख रुपये रोख, अनुक्रमे २० ग्रॅम व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र असा सुमारे आठ ते साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. राजू यांचे वडील आजारी असल्याने घरातील सर्व सदस्य त्यांच्यासोबत हॉलमध्ये एकाच ठिकाणी झोपले होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास खंडाळकर कुटुंबातील महिला उठल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलीस श्वानपथक व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान काही अंतरावर घुटमळले. कपाटावरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असून ते कुख्यात घरफोड्यांच्या रेकॉर्डवरील यादीत कुणाशी जुळते का हे तपासले जात आहे.
बोरेले ले-आऊटमध्ये वर्षभरात किमान दहा ते बारा घरफोड्या होतात. सहा महिन्यांपूर्वी दिनकर धलवार यांचे बंद घर फोडण्यात आले होते. अरुण कांबळे यांच्या घरी सलग तीन वेळा चोरी झाली. जोशी व रिंगणे यांचे घरही फोडले गेले. विशेष असे खंडाळकर यांच्याकडील ही दुसरी चोरी आहे. तीन वर्षांपूर्वी ते शहरातच लग्नासाठी गेले असतात भरदिवसा त्यांचे घर फोडण्यात आले होते. या ले-आऊटमधील सार्वजनिक विहिरीवरील मोटारपंप चोरी जाण्याच्या घटनांनी तर जणू विक्रमच केला. गेल्या काही महिन्यात तब्बल ३० मोटारपंप या विहिरीवरून चोरीला गेल्या आहेत. यावरून बोरेले ले-आऊट परिसर चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. आठ लाखांच्या चोरीच्या या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांची रात्रगस्त असतानाही चोरटे आपल्या मोहिमेत यशस्वी होत असल्याने वडगाव रोड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. शहर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनीही घटनास्थळी भेट देऊन वडगाव रोड पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. नागरिकांकडून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात असताना पोलीसही नागरिकांच्या जागरुकतेबाबत नाराजी व्यक्त करीत आहे.
अनेक सदस्य घरात झोपलेले असताना चोरटे ग्रील काढून, कपाट फोडून ऐवजावर हात साफ करतात आणि घरातील कुणालाच याची खबरबात लागत नाही याबाबत पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मालक घरात असताना चोरी होत असेल तर रस्त्यावरून गस्त घालणाऱ्या पोलिसांचा दोष काय असा प्रश्न पोलीस उपस्थित करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

पोलिसांच्या रात्रगस्तीला चोरट्यांचे आव्हान
जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यात घरफोडीच्या तब्बल दीडशे गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. या पाच महिन्यात जिल्ह्यात सहा दरोडे, दोन दरोड्याची तयारी, २३ दिवसा घरफोड्या तर रात्रीला ११९ घरफोड्या एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लावता आलेला नाही. पुसदमधील शासकीय कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या घरी पडलेल्या दहा लाखांच्या सशस्त्र दरोड्याचा अद्यापही थांगपत्ता नाही. दोन आठवडे उलटूनही दरोडेखोर नेमके कोण हे शोधण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही. नेहमी प्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून प्रगती दाखविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसतो आहे. कधी लोकल असावे तर कधी मराठवाड्यातील असावे असे सांगून पोलीस वेळ मारुन नेताना दिसत आहे.

Web Title: Eight Brokers Around Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.