आठ लाचखोर कर्मचारी बडतर्फ
By Admin | Updated: February 7, 2015 01:35 IST2015-02-07T01:35:11+5:302015-02-07T01:35:11+5:30
लाच घेतल्याचा आरोपात शिक्षा होऊनही कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले.

आठ लाचखोर कर्मचारी बडतर्फ
यवतमाळ : लाच घेतल्याचा आरोपात शिक्षा होऊनही कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने अशा लाचखोर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. यामध्ये महसूूल विभागात सात तलाठी तर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील स्थापत्या अभियांत्रिकी सहायक अशा आठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केल्यानंतर सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ केले जाते. दरम्यानच्या काळात निलंब झालेल्या या कर्मचाऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा पुनर्नियुक्ती देण्यात येते. या कर्मचाऱ्यांवरचा दोष सिध्द झाल्यानंतरही त्यांना कार्यमुक्त करण्यात येत नाही. मुळात पथकाडून कारवाई झाल्यानंतर निलंबित केलेल्या लाचखोर कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्ती देतानाच न्यायालयीन प्रकरणाच्या अधिन राहून नियुक्ती दिली जाते. दोष सिध्द झाल्यास सदर कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करणे अपेक्षित आहे. मात्र अशा न्यायालयीन प्रकरणाकडे संबधित विभागातील आस्थापनेचे दुर्लक्ष होते. परिणामी शिक्षा होऊनही लाचखोर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या वेतनाची उचल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. जुन्याच आदेशाची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेतला.
यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अरविंद झाडे यांनी एक हजाराची लाच घेतल्याच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाली.
दारव्हा तालुक्यातील तलाठी जगदीश सुखदेव मेश्राम, विष्णू वडतकर, वणी तालुक्यातील मिलिंद भाऊराव काळे, उमरखेड तालुक्यातील कैलास दत्तात्रय जाधव, बाभुळगाव तालुक्यातील दिनकर खडतकर, कळंब तालुक्यातील तलाठी मोहन बबनराव चंदने या सात कार्यरत कर्मचाऱ्यांना तर केळापूर तालुक्यातील सेवानिवृत्त तलाठी नारायण मारोती पवार यांना बडतर्फ करण्यात आले. या करावाईमुळे जिल्ह्यातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. यापुढे प्रत्येक न्यायालयीन प्रकारणाचा वरचेवर आढावा घेण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)