स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा
By Admin | Updated: March 7, 2016 02:20 IST2016-03-07T02:20:51+5:302016-03-07T02:20:51+5:30
शासन संपूर्ण स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना राबवीत आहे. नगर परिषद क्षेत्र संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासोबतच स्वच्छ,...

स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा
सचिंद्र प्रताप सिंह : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
यवतमाळ : शासन संपूर्ण स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना राबवीत आहे. नगर परिषद क्षेत्र संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासोबतच स्वच्छ, सुंदर करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
महसूल भवन येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगर परिषदांमधील शौचालय बांधकामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र फुलझेले, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह नगर परिषद, नगर पंचायतींचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित होते.
नगर परिषद क्षेत्र संपूर्णपणे हागणदारीमुक्त झाले पाहिजे. यासोबतच स्वच्छ आणि सुंदर शहरे निर्माण करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. त्यासाठीच नगरपालिका क्षेत्रांकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासन राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नगरपालिका क्षेत्रात याबाबतीत चांगले काम करण्यासाठी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक असून नगर सेवकांनीही आपल्या वॉर्डात जास्तीस जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदनिहाय शौचालय बांधकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमांतर्गत नगर परिषदांनी केलेला खर्च, लाभार्थींना करण्यात आलेले अनुदान वाटप तसेच त्या-त्या नगर परिषद क्षेत्रातील शौचालय बांधकामाबाबत अभियंत्यांची कामगिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. शौचालय बांधकामाची माहिती आॅनलाईन फोटोसह भरावी लागणार असल्याने त्याचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रारंभ झाला आहे. नगर परिषद क्षेत्रात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी नगरपालिकांनी आतापासूनच टंचाई उपाययोजना कराव्या असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जातो तेथे राखीव पाणीसाठ्याचे प्रमाण वाढवून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. नगराध्यक्षांनी यावेळी मांडलेल्या समस्याही जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेऊन त्यावर चर्चा केली. (प्रतिनिधी)