शिक्षण विभागाने केले वर्षभराचे नियोजन

By Admin | Updated: August 14, 2015 02:42 IST2015-08-14T02:42:24+5:302015-08-14T02:42:24+5:30

जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमध्ये वर्षभर राबवावयाच्या उपक्रमाचे नियोजन करून दिले आहे.

Education Department has organized year-round | शिक्षण विभागाने केले वर्षभराचे नियोजन

शिक्षण विभागाने केले वर्षभराचे नियोजन

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या टिप्स : डाटाबेस ‘सरल’विषयी मार्गदर्शन, मुख्याध्यापक उपस्थित
वणी : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमध्ये वर्षभर राबवावयाच्या उपक्रमाचे नियोजन करून दिले आहे.
या संदर्भात सोमवारी यवतमाळ येथील नंदुरकर विद्यालयात जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सत्र नियोजन सभा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह यांनी मुख्याध्यापकांना महत्वाच्या ‘टिप्स’ देऊन आपण स्वत:च्या कार्यक्षेत्रात आपला ठसा कसा उमटवू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. ‘मी कोणत्याही उद््घाटन व कार्यक्रमाला जाण्याचे टाळतो, मात्र जेथे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे विचारमंथन असते तेथे न बोलविताही जातो. कारण मुख्याध्यापक व शिक्षक राष्ट्राचे निर्माते आहे. विकास गंगेचे वाहक आहे. मुख्याध्यापकांनी दररोज १५ मिनीट तरी आपल्या दिवसभराच्या कार्यावर चिंतन केले पाहिजे, मी माझ्या कार्यावर समाधानी आहोत काय, असा प्रश्न विचारला पाहिजे’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
डॉ.आरती फुफाटे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व काय असते, हे आपल्या भाषणातून पटवून दिले. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी वसावे, रोहणे, चव्हाण, विविध विभागांचे प्रभारी मडावी, शेंडगे, विस्तार अधिकारी हजारे, शिक्षण उपनिरीक्षक चंद्रप्रकाश वाहने यांनी आपापल्या कक्षेतील योजनांची माहिती दिली. त्यात सरल डाटाबेस, आम आदमी विमा योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, वरिष्ठ व निवड श्रेणीची नावे, मानव विकास मिशन उपक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, शालेय स्वच्छतेचे महत्व, तंबाखू मुक्त शाळा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, ईन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन, प्लॉस्टिक निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास, नवोदय प्रवेश परीक्षा, या विषयावर नियोजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.
संचालन विस्तार अधिकारी खोब्रागडे यांनी केले. यावेळी रिलायन्स फाउंडेशनतर्फे प्रत्येक शाळेला दोन फुटबॉलचे मोफत वितरण करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
वेतन वेळवर होणार
शाळांनी आपली वेतन देयके दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत पाठविली, तर वेतन एक तारखेलाच देणार, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी वंजारी यांनी दिली. जीपीएफ पावत्यांसाठी तालुकानिहाय शिबिर लावले जाईल. सर्वांना जीपीएफच्या पावत्या मिळाल्याशिवाय मी सेवानिवृत्त होणार नाही, अशी ग्वाही वेतनपथक अधीक्षक चव्हाण यांनी दिली. थकबाकीची देयकेही त्वरित काढली जाईल, असे सांगण्यात आले.
प्रत्येक शाळेत मिनी विज्ञान केंद्र
जिल्ह्यातील प्रत्येक अनुदानित शाळेत ‘मिनी विज्ञान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग, संगती, जमती यांचा लाभ घेता येईल. त्यासाठी मुख्याध्यापकांनी विहित प्रपत्रात माहिती भरून द्यावी, असे चंद्रप्रकाश वाहने यांनी सूचविले.
वैयक्तिक मान्यतांची चौकशी
मागील तीन वर्षात देण्यात आलेल्या वैयक्तीक मान्यतांची फेरतपासणी वरिष्ठ स्तरावरून केली जाणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी सन २०११ पासून मिळालेल्या वैयक्तीक मान्यतेच्या प्रस्तावाची कार्यालयीन प्रत शिक्षण विभागाकडे द्यावी, असे सूचविले. त्यामुळे काही बोगस वैयक्तीक मान्यता झाल्या असल्यास त्याचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Education Department has organized year-round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.