नऊ जणांनी अनुभवला भूकंपाचा थरार
By Admin | Updated: April 30, 2015 00:00 IST2015-04-30T00:00:56+5:302015-04-30T00:00:56+5:30
पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत होतो. काही कळायच्या आत जोरदार कडकडाट झाला.

नऊ जणांनी अनुभवला भूकंपाचा थरार
चाणीचे युवक सुखरुप पोहोचले : काठमांडूच्या पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेतानाच बसला भूकंपाचा हादरा, महाराष्ट्र सदनातून झाली मदतीबाबत विचारणा
रूपेश उत्तरवार यवतमाळ
पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत होतो. काही कळायच्या आत जोरदार कडकडाट झाला. पायाखालची जमीन हलायला लागली. काही क्षण तर आतंकवादी हल्ला असावा असे वाटले. त्यानंतर आम्ही सर्वजण जमिनीवर झोपलो आणि दुरुन आवाज आला भूकंप.. भूकंप... भूकंप... आमची पाचावर धारण बसली. डोळ्याला धारा लागल्या. बाहेर देशात काय होणार याची चिंता सतावू लागली. जिकडे पाहावे तिकडे पडलेल्या इमारती आणि प्रेतांचे खच दिसत होते. अशाही परिस्थितीत आम्ही भारत गाठला. घरी सुखरुप आलो हा चमत्कारच म्हणावा लागेल, असे दारव्हा तालुक्यातील चाणी (कामठवाडा) येथील नेपाळ सहलीसाठी गेलेल्या तरुणांनी सांगितले.
दारव्हा तालुक्यातील चाणी (कामठवाडा) आणि लिंगा येथील नऊ तरुण उत्तर भारतात देवदर्शनासाठी एका खासगी वाहनाने गेले होते. त्यात चाणी येथील संजय डवले, सुरज डवले, सुभाष उके, नथ्थू पारधी, दीपक अमोलकर, नामदेव ठोकळ, प्रफुल्ल डवले, नीलेश पुंड आणि लिंगा येथील उमेश लांडे यांचा समावेश होता. २५ एप्रिल रोजी मानसरोवर ट्रॅव्हल्सच्या मदतीने हे नऊ तरुण काठमांडूत पोहोचले. शनिवारी दुपारपर्यंतच पशुपतिनाथ मंदिर खुले राहते. त्यामुळे या नऊही जणांनी भारतीयप्रमाण वेळेनुसार ११.४१ वाजता (नेपाळच्या वेळेनुसार ११.५६ वाजता) मंदिरात पोहोचलो. मंदिर परिसरातील आठवणी कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न हे नऊ तरुण करीत होते. तोच जोरदार कडकडाट झाला. जमीन हलायला लागली. सारे लोक सैरावैरा धावत होते. हा प्रकार पाहून सर्वच्या सर्व मंदिराच्या समोर आम्ही जमिनीवर झोपलो. मंदिरही हलताना दिसत होते. डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. आपण या आपत्तीतून वाचणार की नाही याची चिंताही सतावत होती. तेथून कसेबसे बाहेर आलो आणि पाहतो तर काय इमारती जमीनदोस्त झालेल्या. लोक सैरावैरा पळत होते. त्याचवेळी पुन्हा दुसरा झटका बसला. आम्ही साखळी करून एकमेकांना घट्ट पकडून ठेवले. पायाखालची जमीनही हालत होती. मोकळ्या मैदानाकडे लोक धावत होते. भलामोठा लोखंडी खांब आमच्या समोर आडवा पडला. त्यावरून उडी मारुन आम्ही पुढे गेलो. इमारती जमीनदोस्त होत होत्या. धुळीने आसमंत व्यापून गेला होता. वाचवा.. वाचवा.. असेच शब्द कानावर येत होते. रस्त्यांना पडलेल्या भेगा आणि खचलेल्या इमारतीपाहून कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते. अशा परिस्थितीतही आणखी भूकंपाचे धक्के बसणार आहे, मोकळ्या मैदानात जा अशा सूचना कानावर ऐकायला येत होत्या.
पशुपतिनाथ मंदिरातून आपल्या मानसरोवर ट्रॅव्हल्सकडे या नऊही जणांनी धाव घेतली. ही बस शोधायलाही बराच वेळ गेला. ज्या ठिकाणी बस उभी होतो तो भागही तिरपा झाला होता. अशा परिस्थितीत आपण आपल्या गावी पोहोचू की नाही अशीच भीती वाटत होती. घरच्यांना संदेश द्यायचा कसा असा प्रश्नही होता.
सर्व मोबाईल आणि दूरध्वनी यंत्रणा ठप्प होती. एकमेकांना आधार देत कोणत्याही परिस्थितीत भारतात पोहोचायचेच असा निश्चय केला. कोठून ताकद आली हे मात्र सांगता येत नाही. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी असा दीडशे किलोमीटरचा घाट पार करीत आम्ही २७ एप्रिलला भारतात प्रवेश केला. सोनवली सीमा दिसताच जीवात जीव आला.
नेपाळमध्ये प्रवेश करताना दिलेला मोबाईल क्रमांक कामी आला. भारतात प्रवेश करताच महाराष्ट्र सदनातून फोन आला. आपल्याला मदत हवी आहे का आपण कुठे आहात अशी विचारणा झाली. त्यावेळी आपण आता निश्चितच घरी पोहोचू असे वाटले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी घरी मोबाईलवरून संपर्क साधला. घरच्या मंडळींच्याही जीवात जीव आला. आयुष्यात कधीही न अनुभवलेला असा हा निसर्गाचा महाप्रलय या नऊ तरुणांनी आपल्या डोळ्यांनी साक्षात अनुभवला. २८ एप्रिलला ही मंडळी गावात पोहोचल्यावर अख्खे गावच त्यांच्या भेटीला आले. आजही हे तरुण भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला काठमांडूचे ते थरार सांगतात. मात्र चेहऱ्यावर भूकंपाची स्पष्ट दहशत दिसून येते.
सात किमीसाठी मोजावे लागले दीड हजार
भूकंपानंतर भारतात येण्याची या मंडळींची धडपड सुरू होती. काठमांडू शहरातून मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी सात किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. त्यासाठी दहा रुपये तिकीट आहे. परंतु भूकंपानंतर दीड हजार रुपये मोजून हे नऊही तरुण मुख्य रस्त्यावर पोहोचले.
हॉटेलमध्ये पुन्हा गेलेच नाही
नेपाळमध्ये प्रवेश करताच या नऊही तरुणांनी काठमांडूच्या शिवशंकर हॉटेलमध्ये आपला मुक्काम ठोकला होता. पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन काठमांडू शहर पहाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पशुपतिनाथाच्या दारातच भूकंपाचा हादरा बसला. मात्र हॉटेलमध्ये साहित्य आणण्यासाठी हिंमतच झाली नाही. सर्व सामान सोडून ही मंडळी सरळ आपल्या बसकडे धावली.