आधी नवीन जिल्हाध्यक्ष, नंतरच जनआक्रोश यात्रा
By Admin | Updated: December 25, 2016 02:32 IST2016-12-25T02:32:45+5:302016-12-25T02:32:45+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या कारभाराविरोधात जिल्हाभर जनआक्रोश यात्रा राबविण्याची घोषणा

आधी नवीन जिल्हाध्यक्ष, नंतरच जनआक्रोश यात्रा
काँग्रेस नेतेच आंदोलनाच्या पावित्र्यात : २९ डिसेंबरचा मुहूर्त टळण्याची चिन्हे
यवतमाळ : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या कारभाराविरोधात जिल्हाभर जनआक्रोश यात्रा राबविण्याची घोषणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. मात्र त्यावरून १२ तास लोटत नाही तोच काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी माणिकरावांच्या या घोषणेला छेद देत ‘नवा जिल्हाध्यक्ष जाहीर झाल्याशिवाय यात्रा नाहीच’ अशी भूमिका घेतली आहे.
माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्या निवासस्थानी निवडक काँग्रेस नेत्यांची बैठक शनिवारी दुपारी पार पडली. या बैठकीला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, संजय देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, नंदिनी पारवेकर, पुसदचे माजी नगरसेवक डॉ. मोहंमद नदीम, डॉ. वजाहत मिर्झा, जीवन पाटील, प्रकाश मानकर आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’ला दिली. मोघे म्हणाले, माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपा सरकारच्या विरोधात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राबवावयाच्या जनआक्रोश यात्रेची घोषणा केली. २९ डिसेंबरपासून वणी तालुक्याच्या कायर येथून ही यात्रा सुरू होणार असल्याचे सांगितले गेले. नेमके या घोषणेच्या वेळी आम्ही नेते मंडळी उपस्थित राहू शकलो नाही. मुळात काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष जाहीर झाल्यानंतरच ही यात्रा काढण्याची सूचना आम्ही माणिकराव ठाकरे यांना केली होती. मात्र त्यांनी जिल्हाध्यक्ष घोषित होण्यापूर्वीच यात्रेची घोषणा केली. आम्ही नेते मंडळी आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत, नवीन अध्यक्षाची तातडीने घोषणा करावी व त्यानंतरच ही यात्रा काढावी, अशी आमची सूचना आहे. २९ डिसेंबरपूर्वी अध्यक्ष जाहीर करावा, त्याला विलंब होत असेल तर जनआक्रोश यात्रा काही काळासाठी पुढे ढकलावी, असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली. काँग्रेस नेत्यांची ‘आधी जिल्हाध्यक्ष नंतरच यात्रा’ ही शनिवारची ताजी भूमिका लक्षात घेता भाजपा सरकार विरोधातील काँग्रेसची यात्रा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
माणिकराव ठाकरेंच्या भूमिकेला अवघ्या काही तासातच काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनी विरोध दर्शवित वेगळी भूमिका घेतल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचे व प्रचंड गटबाजी कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पुरके, देशमुखांची शिफारस
मोघे म्हणाले, सव्वा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरून चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके, निरीक्षक शाम उमाळकर आणि मी स्वत: या समितीत होतो. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलवायचा का आणि बदलवायचा असेल तर नवीन चेहरा कोण ? या दोन मुद्यावर या समितीने निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष बदलवायचा परंतु नगरपरिषद निवडणुकीनंतर असा सल्ला माणिकरावांनी दिला. तो मान्य केला गेला. दरम्यान वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर कुणाची वर्णी लावावी, यासाठी बैठक झाली. त्यात जिल्हा काँग्रेस कमिटीने वसंतराव पुरके आणि संजय देशमुख या दोघांच्या नावाची शिफारस एकमताने प्रदेश काँग्रेसकडे केली. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाध्यक्ष नाही म्हणून काम थांबू नये - माणिकराव ठाकरे
काँग्रेस नेत्यांच्या ताज्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नाही, म्हणून पक्षाचे कामकाज थांबविले जाऊ नये, उलट आणखी वेगाने चालले पाहिजे. कारण जिल्हाध्यक्ष नसला तरी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ज्येष्ठ नेते मंडळी आहेच. त्यांच्याच नेतृत्वात तेथे जनआक्रोश यात्रा काढायची आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी फार कमी दिवस शिल्लक आहे. ते लक्षात घेता भाजपा सरकारचे वास्तव जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसने सर्वच ठिकाणी जनआक्रोश यात्रेचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. त्याचा पक्षाला निवडणुकीत निश्चित फायदा होईल. नवा जिल्हाध्यक्ष व्हावा ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. वामनराव कासावार यांनी सर्व नेत्यांच्या सांगण्यावरूनच राजीनामा दिला आहे. या रिक्त झालेल्या पदावर लवकर कुणाची नियुक्ती व्हावी ही वामनरावांसह सर्वांचीच भूमिका आहे. तरीही कुणाचा गैरसमज असेल तर सर्वांचे म्हणणे लक्षात घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील पावले टाकली जातील, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.