जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’मुळे झाले गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:14 IST2017-12-12T22:13:49+5:302017-12-12T22:14:08+5:30
जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे.

जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’मुळे झाले गतिमान
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे. पूर्वी मुख्यालयात तासन्तास चालणाºया आढावा बैठका आता अर्ध्या तासात आटोपून खºया अर्थाने कामासाठी वेळ दिला जात आहे. यामुळे संगणकीकृत गाव शेततळे, नरेगाची वेळेत मजुरी, अशा विविध योजनांनी गती पकडली आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा काही दिवसापूर्वी प्रचंड दबावात व तणावात कार्यरत होती. यामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला होता. जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारताच यंत्रणेत सहकार्याची भावना निर्माण करून कामकाजाची गती वाढविण्यास प्रोत्साहन दिले. संगणकीकृत गाव यामध्ये सप्टेंबरपर्यंत केवळ ७९९ गावे झाली होती. आता केवळ तीन महिन्यात दोन हजार ८५ गावे रिएडीट आज्ञावलीअंतर्गत संगणकीकृत झाली. यात जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला.
शेततळे निर्मितीसाठी एसडीओंनी पुढाकार घेतला असून तीन महिन्यात २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डची पडताळणी पूर्ण करून मजुरी वितरण नियमित केले आहे. बीएलओच्या कामाला शिक्षकांनी विरोध केला होता. मात्र यात जिल्ह्याने इतर पाच मतदारसंघाच्या तुलनेत आघाडी घेतली असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडून शाबासकी मिळाली.
प्रत्येक सोमवारी आढावा बैठक होत असून ठळक मुद्यांवरच आवश्यक ते निर्देश देऊन निकाली काढली जाते. महत्त्वाच्या मुद्यांवर तालुका व उपविभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना बोलविण्याऐवजी ‘व्हीसी’व्दारे आढावा घेतला जातो. यामुळे सर्वच घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
तहसील कार्यालय व इतर यंत्रणेतील पेंडन्सी दूर करण्यासाठी कर्मचाºयांना प्रोत्साहित केले असून आठवड्यातील सुट्यांच्या दिवशी जुने काम हातावेगळे केले जात आहे. महिला वर्गही या मिशनमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाला आहे.
निवेदन घेऊन येणाऱ्यांसाठी अर्जंट रेफरन्स
छोट्याछोट्या समस्या घेऊन सामान्य नागरिक जिल्हा मु्ख्यालयी येतात. त्यांचे अर्ज, निवेदने निकाली काढण्यासाठी ‘अर्जंट रेफरन्स’ हे सॉफ्टवेअर विकसित केले असून संकीर्ण अंतर्गत नोंद घेतली जाते. प्रत्येक दिवशी त्या विभागाकडे अर्जाच्या पूर्ततेबाबत पाठपुरावा होतो.
प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी छोटे छोटे फेरबदल केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून तीन महिन्यांतच जिल्हा राज्य पातळीवर पहिल्या पाचमध्ये आहे. यासाठी कर्मचारी व अधिकाºयांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.’
- डॉ.राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, यवतमाळ