प्रसूती टेबलवरून पडून बाळंतिणीचा मृत्यू

By Admin | Updated: March 8, 2016 02:36 IST2016-03-08T02:36:52+5:302016-03-08T02:36:52+5:30

प्रसुती टेबलवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

Dying from the labor delivery tablets and the death of the baby | प्रसूती टेबलवरून पडून बाळंतिणीचा मृत्यू

प्रसूती टेबलवरून पडून बाळंतिणीचा मृत्यू

यवतमाळ : प्रसुती टेबलवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी मध्यरात्री घडलीे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात मुलीचे मातृछत्र हिरावल्या गेले. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुर्गा मनोहर डहाणे (२८) रा. मनपूर ता. यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे. दुर्गा पहिल्या प्रसूतीसाठी गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. तिची वैद्यकीय तपासणी करून तिला रक्त देणे आवश्यक असल्याचे विभागप्रमुख डॉ. संध्या पजई यांनी सांगितले. त्यावरून दुर्गाचा पती मनोहर विष्णू डहाणे याने रक्ताची व्यवस्था केली. गुरुवारी दुर्गाला एक बॅग रक्त लावण्यात आले. तिची प्रकृती पाहता आणखी तातडीने रक्त लावावे, अशा सूचना डॉ. पजई यांनी मनोहरसमक्ष अधिनस्थ डॉक्टरांना केल्या. मात्र त्यानंतरही दोन दिवस रक्तच लावण्यात आले नाही. प्रसवकळा सुरू झाल्या तेव्हा रविवारी सायंकाळी तिला रक्त लावण्यात आले. अशाच स्थितीत तिची प्रसूती करण्यात आली. यावेळी अधिव्याख्याता डॉ. सोनल देशमुख उपस्थित होत्या. बाळ, बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे मनोहरला सांगण्यात आले. मनोहरच्या आईजवळ बाळाला देण्यात आले. त्या वॉर्डातील पलंगावर बाळाला घेऊन गेल्या. तेव्हाच दुर्गालाही अर्ध्यातासात टाके मारून बाहेर काढणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रत्यक्षात मात्र रात्री साडेतीन वाजेपर्यंत दुर्गाला प्रसूतिगृहातून बाहेर काढलेच नाही. शेवटी तेथे साफसफाई करणाऱ्या महिलेने दुर्गा टेबलवरून खाली पडल्याचे मनोहरला सांगितले. सर्वांनी धाव घेऊन दुर्गाला उचलून टेबलवर ठेवले त्यावेळी प्रसूतिगृहात एकही डॉक्टर अथवा परिचारिका उपस्थित नव्हती. दुर्गाची प्रकृती गंभीर झाल्याने धावाधाव करण्यात आली. पुन्हा नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले. शेवटी सकाळी पाच वाजता दुर्गाचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील वॉर्ड बॉयने दिली, अशी आपबिती मनोहरने ‘लोकमत’जवळ कथन केली.
प्रसूती वॉर्डात कार्यरत असलेले डॉक्टर व इतर कर्मचारी रुग्णांशी असभ्य वर्तणूक करतात. त्यांची वागणूक बेजबाबदारपणाची असून प्रसव वेदनेने तळमळणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करून येथील डॉक्टर व कर्मचारी व्हॉटसप्वर व्यस्त असतात, अशा तक्रारी सातत्याने होतात, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही, या गंभीर प्रकरणात दुर्गाच्या पतीने दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष प्रवीण प्रजापती त्यांच्यासोबत होते. (शहर वार्ताहर)

हलगर्जीपणा नित्याचाच
४शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा नित्याचाच झाला आहे. येथील माता व बालमृत्यूचे प्रमाण धक्कादायक आहे. याची राष्ट्रीय मानव आयोगानेही दखल घेतली असून त्याबाबत खटला सुरू आहे. मात्र त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाचा कारभार सुधारलेला नाही. येथील अव्यवस्थेनेच दुर्गाचा बळी घेतला आहे. या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

दुर्गाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. तिला अ‍ॅनिमिया असल्याने प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला. यातच हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला असावा. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. योग्य ती दक्षता घेण्यात आली होती.
- डॉ. संध्या पजई
विभागप्रमुख, स्त्री रोग, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

Web Title: Dying from the labor delivery tablets and the death of the baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.