तलावात ‘डम्पिंग यार्ड’

By Admin | Updated: February 3, 2016 02:40 IST2016-02-03T02:40:45+5:302016-02-03T02:40:45+5:30

नगरपरिषदेकडून शहर विकासाचा बागुलबुवा केला जात असतानाच शहरातील घनकचऱ्याचे नियोजन मात्र करता आले नाही.

'Dumping yard' in the lake | तलावात ‘डम्पिंग यार्ड’

तलावात ‘डम्पिंग यार्ड’

यवतमाळ नगरपरिषद : सफाई कंत्राटदाराची मनमानी, प्रशासनाची चुप्पी
यवतमाळ : नगरपरिषदेकडून शहर विकासाचा बागुलबुवा केला जात असतानाच शहरातील घनकचऱ्याचे नियोजन मात्र करता आले नाही. मागील आठ महिन्यांपासून सावरगडचा अधिकृत कचरा डेपो बंद असल्याने शहराच्या तलावफैल भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जात आहे. येथील ऐतिहासिक तलावालाच सफाई कंत्राटदारांनी ‘डम्पिंग यार्ड’ बनविले आहे. याला नगरपरिषदेचीही मूकसंमती आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही हा प्रकार सुरू आहे.
नगरपरिषदेने दोन कंत्राटदारांना स्वच्छतेचा ठेका दिला आहे. त्यासाठी महिन्याकाठी १५ लाख रुपये मोजले जाते. स्वच्छता मात्र कुठेच दिसत नाही. घंटागाडीने कचरा गोळा करून वसाहतीतील कचरा संकलन केंद्रावर टाकला जातो. तेथून तो ट्रॅक्टरद्वारे ‘डम्पींग यार्ड’मध्ये नेणे अपेक्षित आहे. मात्र खर्चाला कात्री लावण्यासाठी कंत्राटदार संकलन केंद्राहून कचराच उचलत नाही. यामुळे अनेक भागातील नागरिकांनी संकलन केंद्रच बंद केले आहे.
आता धामणगाव मार्गावरील बीएसएनएल कार्यालयाच्या गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जात आहे. इतकेच नव्हे तर मेलेले प्राणीही येथेच फेकून दिले जाते. याहीपेक्षा गंभीर स्थिती शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या तलावाची झाली आहे. या तलावात कचरा आणून टाकला जातो. नंतर तो जेसीबीद्वारे दूरपर्यंत तलावात लोटून दिला जातो.
पावसाळ्यात हा कचरा कुजून मोठी दुर्गंधी पसरते. आता उन्हाळा असल्याने वरवरचा कचरा पेटवून देण्यात येतो. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपये शहर स्वच्छतेवर खर्च केले जातात. प्रत्यक्षात स्वच्छतेच्या नावाखाली कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासण्याचे काम सुरू आहे, असा आरोप तलावफैल परिसरातील नागरिकांनी केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Dumping yard' in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.