कोट्यवधींच्या रस्ते बांधकामात डांबराची बोगस बिले
By Admin | Updated: February 8, 2015 23:39 IST2015-02-08T23:39:54+5:302015-02-08T23:39:54+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर उपविभागात रस्त्यांची कोट्यवधीची कामे केली. ही कामे कंत्राटदारांऐवजी मजूर संस्थांना देण्यात आली. विटा-रेती सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून घेतलेली

कोट्यवधींच्या रस्ते बांधकामात डांबराची बोगस बिले
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर उपविभागात रस्त्यांची कोट्यवधीची कामे केली. ही कामे कंत्राटदारांऐवजी मजूर संस्थांना देण्यात आली. विटा-रेती सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून घेतलेली डांबराची बोगस बिले सादर करण्यात आली. बांधकाम विभागानेही त्यावर आक्षेप न घेता देयके निकाली काढली, हे विशेष!
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीतून नेर तालुक्यात आॅक्टोबर २०१३ ते सप्टेबर २०१४ या कालावधीत रस्त्यांची कोट्यवधी रूपयांची कामे करण्यात आली. या कामांचे ई-टेंडरींग न करता ही कामे मजूर संस्थांना देण्यात आली. वास्तविक कोल्डमिक्स, हॉटमिक्स हा बांधकाम प्रकार कुशल कामांमध्ये मोडतो. तर मजूर संस्थाना एका मर्यादेपर्यंत कुशल कामे करण्याचा अधिकार आहे. तरीही ही कामे मजूर संस्थांना देण्यात आली. ही कामे होत असताना स्थानिक उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याने मजूरांची पडताळणी केली नाही. कामावर राबत असलेला मजूर हजेरी पटावरील मजूर यांची कुठलीही शाहनिशा केली गेली नाही. त्यामुळे यातील काही कामे मजूर संस्थांऐवजी ठराविक वाटा देवून कंत्राटदारांनीच केली. कामे मजूर संस्थांच्या नावावर असल्याने दर्जाच्या भानगडीत कंत्राटदार पडले नाही. त्यामुळे रस्ते उखडल्याचे दिसते.
काम वाटपाच्या निकषात घोळ करून ही कामे दिल्या गेली. डांबर विक्रीचे अधिकार हिंदुस्थान पेट्रोलीयम आणि भारत पेट्रोलियम व त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांनाच आहे. असे असताना चक्क विटा-रेती सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून डांबर खरेदीच्या पावत्या जोडण्यात आल्या. कामांचा दर्जा न तपासता प्रमाणपत्र देवून आणि बोगस बिले स्विकारून या कामांची देयके काढण्यात आली. त्यामध्ये अभियंता आणि लिपीकवर्गीय यंत्रणा अशी आठ टक्क्यांची आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)