विदर्भा नदीचे झाले वाळवंट
By Admin | Updated: March 9, 2016 00:12 IST2016-03-09T00:12:48+5:302016-03-09T00:12:48+5:30
तालुक्यातून बारमाही वाहणारी विदर्भा नदी पूर्णत: आटल्याने नदीचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. नदीत केवळ वाळू व बेशरमाची झाडेच तेवढी शिल्लक आहे.

विदर्भा नदीचे झाले वाळवंट
वणी : तालुक्यातून बारमाही वाहणारी विदर्भा नदी पूर्णत: आटल्याने नदीचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. नदीत केवळ वाळू व बेशरमाची झाडेच तेवढी शिल्लक आहे. नदी काठाजवळ असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे लगतच्या गावातील पाण्याची पातळीही खालावत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात विदर्भा नदी काठावरील गावांना पाणी टंचाईची तीव्र झळ बसण्याची शक्यता आहे.
विदर्भा नदीच्या भरवशावर नदी काठावरील गावाचे जीवन अवलंबून असते. याच नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र यावर्षी विदर्भा नदीची पातळी पूर्णत: खालावल्याने नदीमध्ये केवळ पाण्याचे डबकेच शिल्लक राहिले आहे. विदर्भा नदीवरून अनेक गावांत नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदीत आता पाणीच शिल्लक नसल्याने बहुतांश गावांमध्ये एक दिवसाआड पाण्याच्या पुरवठा करण्यात येत आहे.
या नदीच्या काठावर कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण व घोन्सा खुली कोळसा खाण, अशा वेकोलिच्या दोन कोळसा खाणी आहेत. या दोन खाणींमधून दररोज हजारो टन कोळसा काढला जातो. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. परिणामी नदी काठावरील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गाव-खेड्यातील अनेक बोअरवेललाही पाणी येत नाही. या बोअरवेलजवळ महिला पाण्यासाठी तास न् तास उभ्या राहून मिळेल तेवढे पाणी घेऊन जाताना दिसत आहे.
पूर्वी याच बोअरवेलमधून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र गेल्या वर्षीपासून ही परिस्थिती पालटली आहे. अनेक गावांतील बोअरवेलची पातळी खालावल्याने बोअरवेलमधून पाणी बाहेर येण्यासाठी किमान १० मिनीटे वेळ लागतो. परिणामी महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. नळाचे पाणीही जास्त वेळ राहात नाही. त्यात महावितरणचे भारनियमनही असते. अनेकदा महिला शेतात गेल्यानंतर दुपारी नळ सोडण्यात येत असल्याने ते पाणी केवळ रस्त्याने वाहताना दिसत आहे.
विदर्भा नदीचे अद्याप खोलीकरण करण्यात आले नाही. सोबतच नदीमध्ये बेशरमाची झाडे, लव्हाळे, झुडूपे वाढली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी घोन्सा येथील ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने नदीतील बेशरमाची झूडूपे व लव्हाळे काढून खोलीकरण केले होते. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने नदीत पाणीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. घोन्सा परिसरात असलेल्या कोळसा खाणीच पाण्याची पातळी कमी होण्याला कारणीभूत असल्याचे नदी काठावरील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
आता पुन्हा घोन्सा परिसरातील काही शेती वेकोलिने संपादित केल्याने पुन्हा नवीन कोळसा खाण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या नदीला पाणी राहिल की नाही, हा असा प्रश्न निर्माण झाला. (कार्यालय प्रतिनिधी)