सागवान तस्करीमुळे वनवैभव धोक्यात

By Admin | Updated: May 18, 2014 23:57 IST2014-05-18T23:57:51+5:302014-05-18T23:57:51+5:30

पुसद : नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पुसद तालुक्यावर सागवान तस्करांची वक्रदृष्टी पडली असून दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगल मात्र विरळ होवू लागले आहे.

Due to the smuggling of wildlife, the threat of waste | सागवान तस्करीमुळे वनवैभव धोक्यात

सागवान तस्करीमुळे वनवैभव धोक्यात

 पुसद : नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पुसद तालुक्यावर सागवान तस्करांची वक्रदृष्टी पडली असून दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगल मात्र विरळ होवू लागले आहे. जंगलामध्ये असलेला सागवान तस्करांचा मुक्तसंचार वनविभागापुढे मोठे आव्हान ठरले आहे. पुसद वनविभागाचे कार्यक्षेत्र पुसद, दिग्रस, महागाव, उमरखेड, दारव्हा, आर्णी आदी तालुक्यापर्यंत विस्तारलेले आहे. यामध्ये ३७७ गावांचा समावेश असून वनक्षेत्र ६९ हजार ४३५.२६ हेक्टर इतके आहे. पुसद उपविभागातील जंगल हे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १५.५३ टक्के इतके आहे. पुसद तालुक्यात पुसद, शेंबाळपिंपरी व मारवाडी असे तीन वनपरिक्षेत्र आहे. तालुक्यात मारवाडी, खंडाळा, शेंबाळपिंपरी, पूस धरण परिसर, गहुली, चोंढी, बान्सी, धुंदी, घाटोडी, बेलगव्हाण, शिळोणा, कारलादेव, फुलवाडी, माणिकडोह, धनसळ-मनसळ आदी भाग जंगलाने व्यापलेला आहे. मुख्यत: सागवान लाकडासाठी सदर जंगल प्रसिद्ध आहे. या जंगलात सागवानासह धावंडा, पिवस, लेडीया, तेंदू, रोहण, सालई, ऐन, अर्जून, बेहडा आदी वृक्षांचे प्रजाती दिसून येतात. तसेच पाराजीत, मुरडशेंग, घायटी, रायमुनिया, भराटी आदी झुडुपे दिसतात. मारवेल, पवनेर, भूर, भुसरी आदी प्रकारचे गवत आणि पळसवेल, माहुलवेल, पिवरवेल, चिलाटी, येरूनी आदी वेली या जंगलात दिसून येतात. पुसद उपविभागातील जंगलात बिबट, तडस, लांडगा, कोल्हा आदी मांस भक्ष्यी प्राणी आढळतात. तर काळवीट, चितळ, निलगाय, अस्वल, रानडुक्कर, वानर, ससा आदी तृणभक्षी प्राण्यासह सरपटणारे प्राणीसुद्धा वास्तव्यास आहे. प्राण्यांप्रमाणेच या जंगलात पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. पुसद, मारवाडी, शेंबाळपिंपरी, दिग्रस, महागाव, काळी दौलत, उमरखेड आदी सात वनपरिक्षेत्र असून १९ वर्तुळे आहेत. पहिल्या जंगल सत्याग्रहाने प्रकाशझोतात आलेल्या या परिसराला आता सागवान तस्करांनी वेढा घातला आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी, खंडाळा, मारवाडी आदी भागात सागवान चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रात्रीच्यावेळी आंध्र प्रदेशासह विविध भागातील सागवान तस्करांचे जंगलामध्ये वास्तव्य असते. विशेषत: अमावस्येच्या रात्री दिवशी सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. रात्रीच्या वेळी टोळक्या टोळक्याने सागवानाच्या झाडाची कत्तल केल्या जाते. धारदार अवजाराने त्याचे तुकडे पाडून विशिष्ट वाहनांच्या माध्यमातून हा माल आंध्र प्रदेशात रवाना केला जातो. या पूर्वीसुद्धा आंध्र प्रदेशातील सागवान तस्करांची ही तस्करी वन विभागाने उघड केली होती. एकीकडे मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत असताना वन विभागाचे कर्मचारी मात्र यावर प्रतिबंध घालण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जंगलामध्ये सागवान तस्करांचा हैदोस सुरू असताना दुसरीकडे मात्र तालुक्यातील अनेक गावालगतच्या जंगलांमध्ये वृक्षतोड करून गावकर्‍यांनी अतिक्रमण केले आहे. पुसद वनविभागात मोठ्या प्रमाणात वन कर्मचारी तैनात असूनही वृक्षतोडीला आळा घालण्यात वनविभागाला अपयश आल्याचे दिसून येते. या प्रकारावर वेळीच प्रतिबंध घातला गेला नाही तर वनवैभव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the smuggling of wildlife, the threat of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.