मारेगावात पाणी टंचाईचे सावट
By Admin | Updated: March 5, 2017 01:06 IST2017-03-05T01:06:20+5:302017-03-05T01:06:20+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे.

मारेगावात पाणी टंचाईचे सावट
नागरिक हतबल : पाणी पुरविण्यास नगरपंचायत ठरली असमर्थ
मारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असून शहरात पाण्याचे स्त्रोत नसल्याने पाण्याची समस्या कशी सोडवावी, या प्रश्नाने नगरपंचायत प्रशासन हतबल झाले आहे.
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३० वर्षांपूर्वी १० हजार लिटरची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीत शहरालगतच्या पिसगाव नाल्यावरील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असे. परंतु तीन किलोमीटर अंतराची नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाली. अनेक ठिकाणी पाईप फुटले. त्यामुळे दोन वर्षांपासून ही नळयोजना बंद पडली. तत्कालिन ग्रामपंचायतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील अनेक वॉर्डात बोअरवेल मारून त्यावर मोटारपंप बसवून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु शहरात खोदलेल्या बोअरवेलला पुरेसे पाणी नसल्याने आणि वीज पुरवठा चांगल्या दाबाचा होत नसल्याने अनेकदा बोअरवेलमधील मोटारपंप जळून शहरातील पाणी पुरवठा ठप्प होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतररत्र भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात आतापासूनच पहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. परिणामी भूजल पातळी झपाट्याने खोल चाचली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक आठ, १५, चार, तीनसह अनेक वॉर्डात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलला पाणीच नसल्याने भविष्यात शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीचे कोणतेही साधन नाही. लोकांच्या मागणीचा रेटा पुढे केल्यानंतर नगरपंचायत प्रशासन किरायाने टँकर घेऊन पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. परंतु शहराला पाणी पुरवठा कमी आणि पाण्यासाठी नागरिकांची भांडणेच जास्त, असाच प्रकार उन्हाळाभर शहरात सुरू असतो. आता शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने १० मार्च रोजी शुक्रवारी विशेष सभा आयोजित केली आहे. सभेत नगरसेवक पाण्याची समस्या आक्रमकपणे मांडणार असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. (शहरप्रतिनिधी)