टंचाईत आर्णीला दिलासा

By Admin | Updated: February 29, 2016 02:06 IST2016-02-29T02:06:24+5:302016-02-29T02:06:24+5:30

सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे.

Due to the scarcity of the arani console | टंचाईत आर्णीला दिलासा

टंचाईत आर्णीला दिलासा

दररोज पाणी : अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले
आर्णी : सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे. अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने शहरात दररोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता वाढली आहे.
आर्णी शहरात १६ विहिरी व सात बोअरवेलच्या माध्यमातून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा नसतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईमध्ये पाणीपुरवठ्याचे काय होणार याची चिंता नगरपरिषदेला सतावत होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या विहिरी अरुणावती नदीपात्राला लागून आहे. या विहिरींच्या बळावरच जवळपास ५० टक्के शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या विहिरींची पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली होती. काही भागात तर तब्बल आठ-आठ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात होता.
या परिस्थितीवर उपाय म्हणून अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडणे हा पर्याय पुढे आला. त्यामुळे नगरपरिषदेकडून तातडीने अरुणावती प्रकल्पाला पत्र देवून पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. आरक्षित पाणीसाठा यावर्षी वाढविण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता यवतमाळ, पाटबंधारे मंडळ, कार्यकारी अभियंता अरुणावती प्रकल्प दिग्रस यांना २६ फेब्रुवारीला पत्र पाठविले. याची दखल घेत लगेच प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. कोरडे पडलेले अरुणावती नदीचे पात्र सध्या भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहात आहे. यामुळे नदीला लागून असलेल्या विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढण्यासाठी फायदा होणार आहे. जनावरांनासुद्धा पाणी मिळण्याची सोय होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्र पाण्याने भरलेले पाहून आर्णीकर नागरिक सुखावले आहेत.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to the scarcity of the arani console

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.