यादीतील घोळामुळे दुष्काळाची मदत फसली
By Admin | Updated: February 13, 2015 01:58 IST2015-02-13T01:58:43+5:302015-02-13T01:58:43+5:30
दुष्काळाची मदत जमा करण्यासाठी मागितलेल्या बँक खात्यामध्ये तलाठ्यांनी प्रचंड घोळ केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काही शेतकऱ्यांची तर बँक बदलविण्यात आली.

यादीतील घोळामुळे दुष्काळाची मदत फसली
किशोर वंजारी नेर
दुष्काळाची मदत जमा करण्यासाठी मागितलेल्या बँक खात्यामध्ये तलाठ्यांनी प्रचंड घोळ केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काही शेतकऱ्यांची तर बँक बदलविण्यात आली. परिणामी त्यांना अजूनही दुष्काळाची मदत मिळाली नाही. तहसील कार्यालयाचे उंबरठे या शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहे. तालुक्यात घडलेल्या या प्रकाराने महसूल प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गावाच्या आद्याक्षरानुसार मदतीचे वाटप करण्यात येत आहे. तत्पूर्वी महसूल विभागाने मदतीस पात्र गावोगावच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची यादी तयार करण्याचे काम तलाठ्यांकडे सोपविले. परंतु या कामात हयगय करण्यात आल्याचे काही बाबींवरून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून ही माहिती उपलब्ध करून न घेता इतर व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीमुळे झालेला घोळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
तालुक्याच्या इंद्रठाणा येथील चरणदास मेश्राम यांचे खाते स्टेट बँकेत आहे. मात्र तलाठ्याने सादर केलेल्या यादीमध्ये त्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत दाखविण्यात आले. आपल्या खात्यात मदतीची रक्कम का जमा झाली नाही, याची चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. मात्र झालेली चूकही महसूल प्रशासन दुरुस्त करून देण्यास चालढकल करत आहे. गेली काही दिवसांपासून त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. याच गावातील जगन बन्सोड यांच्या शेताचा समावेशच यादीमध्ये करण्यात आला नाही. तेही सध्या तरी मदतीपासून वंचित आहे.
तलाठ्यांनी प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्याकडून बँक खात्याची माहिती घेणे आवश्यक असताना उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार करण्यात आला आहे. अजूनही काही गावांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याद्या तयार करताना संबंधितांनी दक्षता बाळगावी, अशा सूचना तहसीलदारांनी द्याव्या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अडचणीच्या काळात रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.