जिल्हा बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड

By Admin | Updated: November 18, 2016 02:32 IST2016-11-18T02:32:51+5:302016-11-18T02:32:51+5:30

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे

Due to lack of cash in the district bank, the farmers' neglected | जिल्हा बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड

जिल्हा बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड

निराधारांनाही फटका : दोन दिवसांपासून शेतकरी बँकेसमोर रांगेत, दुष्काळात तेरावा महिना
बाभूळगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे शेतकरी राजा बँकेसमोर कॅश येण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र गुरूवारी निदर्शनास आले. हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेकडून मिळालेला हा दुसरा झटका आहे.
सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द ठरविल्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेने १५ नोव्हेंबरपासून आपल्या शेतकरी ग्राहकांकडून आलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांचे या बँकेत खाते आहे. यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांचे इतर बँकांमध्ये खाते नाही. त्यामुळे अंदाजे १५ हजार शेतकरी हक्काची बँक सोडून इतर बँकेच्या दारात नोटा बदलवताना आढळून आले. या बँकेत मंगळवारला दुपारनंतर कॅश संपल्याचे सांगून परत केले गेले. शेतकरी बुधवारी दिवसभर बँकेत बसून राहिले कॅश आली नाही. गुरूवारला बाभूळगावचा आठवडी बाजार असतो. शेतकरी बाजाराकरिता पिशव्या घेऊन बँकेत आले. मात्र कॅश नसल्याने त्यांनी तेथेच ठाण मांडले अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हक्काचा, घामाचा पैसाही त्यांना दिला जात नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून तीन दिवसात बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या गेलेला हा दुसरा झटका आहे. या संबंधात शाखा व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता कॅश आणण्याकरिता नागपूरला गाडी पाठविली होती. कॅश न मिळाल्याने गाडी परत आली, असे त्यांनी सांगितले.
काही बँक आपल्या मर्जीनुसार ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे चित्र दृष्टीस पडले. येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत पाचशे रुपयांच्या दहा नोटा जरी बँकेत भरल्या तरी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जात आहे. इतर बँकामध्ये जुन्या नोटा बदलविताना आधारकार्ड मागण्यात येत आहे. यावरून बँकांचा आपसात ताळमेळ नाही, असे दिसते आहे. शेकडोंच्या संख्येत असलेल्या निराधारांची आज मोठी गोची झाली. सहाशे रूपये महिना त्यांना मिळतो. बँकेत दोन हजारांच्याच नोटा असल्याने त्यांना परत केले गेले. काही गरिबांच्या खात्यात केवळ एकच हजार रुपये आहेत. बँकेत दोन हजारांचीच नोट असल्याने त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता आले नाही. परिणामी अनेकांची कामे आणि दैनंदिन व्यवहार खोळंबले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of cash in the district bank, the farmers' neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.