व्यसनमुक्ती सप्ताहात कार्यक्रमांची रेलचेल
By Admin | Updated: October 3, 2016 00:23 IST2016-10-03T00:23:44+5:302016-10-03T00:23:44+5:30
येथील आझाद मैदानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

व्यसनमुक्ती सप्ताहात कार्यक्रमांची रेलचेल
महात्मा गांधी यांना अभिवादन : पालकमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ
यवतमाळ : येथील आझाद मैदानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनानंतर पालकमंत्र्यांनी व्यसनमुक्ती रॅलीला हिरवी झेंडी दाखविली, तसेच व्यसनमुक्ती सप्ताहाचा शुभारंभ केला. २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहे.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी जया राऊत, सहायक समाजकल्याण आयुक्त पीयूष चव्हाण आदी उपस्थित होते. आझाद मैदान येथून निघालेली व्यसनमुक्ती रॅली येरावार चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा परिषदेच्या आवारात विसर्जित झाली. रॅलीतील विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून व्यसनमुक्ती सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहात जनजागृती करून प्रामुख्याने युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आझाद मैदानात महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा परिषदेने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले. सुमारे साडेचार लाख शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंगला यांनी सांगितले.
गांधी, शास्त्रींना अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (वार्ताहर)