शहरातील ‘एटीएम’वरील गर्दीने दिवाळीची खरेदीही खोळंबली
By Admin | Updated: November 11, 2015 01:56 IST2015-11-11T01:56:27+5:302015-11-11T01:56:27+5:30
बहुतेक चाकरमान्यांना दिवाळीची केवळ एक-दोन दिवस सुटी आहे.

शहरातील ‘एटीएम’वरील गर्दीने दिवाळीची खरेदीही खोळंबली
अर्धेअधिक बंद : रांगेत उभे राहून ग्राहक त्रस्त, ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया
यवतमाळ : बहुतेक चाकरमान्यांना दिवाळीची केवळ एक-दोन दिवस सुटी आहे. खासगी नोकरदारांना तर केवळ एक दिवस सुटी. त्यातच कसेबसे वेळेचे नियोजन करून बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी कुटुंबाला घेऊन निघायचे आणि एटीएमवर जाऊन पैसे काढून पटकन खरेदी करायची, असा अनेकजण बेत आखत आहे. परंतु एटीएमवर जाऊन पाहतात, तर पैसे काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. या रांगांमुळे अनेकांची दिवाळीची खरेदी रेंगाळली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून यवतमाळच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील ग्राहकांसह जिल्हाभरातून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज यवतमाळ शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूकही खोळंबत आहे. अशातच अनेक एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ते बंद आहेत. तर ज्या एटीएममध्ये पैसे आहेत, त्यांच्यासमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
ग्रामीण भागातील अनेकजण यवतमाळला गेल्यावर एटीएममधून पैसे काढून खरेदी करू, असा बेत आखून शहरात दाखल होत आहेत. परंतु, या ठिकाणी आल्यावर एटीएमची परिस्थिती पाहता त्यांना धक्काच बसत आहे. अनेक एटीएम बंद आहेत. तर मोजक्याच एटीएममध्ये पैसे असल्याने अशा ठिकाणी पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरगावहून एटीएमच्या भरवशावर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे.
अनेक नागरिकांनी तर एटीएमची झंझट नको म्हणून सरळ आपली बँक गाठली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून एटीएम असल्यामुळे बँकेचे तोंडच न पाहणाऱ्यांची अशावेळी कोंडी होत आहे. त्यातच आता दोन दिवस बँकांनाही सुटया आल्या आहेत.
अनेकजण बँकांच्या या ढिसाळ कारभाराला दूषणे देत आहे. ऐन सणासुदीच्या काळात जर एटीएममधून पैसे मिळत नसेल, तर ते काय कामाचे, असा संतप्त सवाल करताना ग्राहक दिसत आहेत. (प्रतिनिधी)