ट्रान्सफार्मर जळाल्याने ओलीत दुर्लभ, शेतकरी झाले संतप्त
By Admin | Updated: October 9, 2014 23:09 IST2014-10-09T23:09:35+5:302014-10-09T23:09:35+5:30
येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़

ट्रान्सफार्मर जळाल्याने ओलीत दुर्लभ, शेतकरी झाले संतप्त
मार्डी : येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़
विठ्ठल बदकी यांच्या शेतात असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवरून परिसरातील २७ कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो. याशिवाय काही अवैध जोडण्या असण्याचा आरोप आहे़ या ट्रान्सफार्मरच्या क्षमतेनुसार २० कृषी पंपाना विद्युत पुरवठा होऊ शकतो़ परंतु विद्युत विभागाचा आनागोंदी कारभार आणि कामचलावू धोरणामुळे यांत्रिक क्षमता विचारात न घेता नियमबाह्य पध्दतीने जादा जोडण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याचा परिणाम ट्रान्सफार्मरवर झाला. ते ओव्हरलोड होऊन सयंत्रात बिघाड निर्माण झाला. अखेर हे ट्रान्सफार्मरच जळाले.
या बाबी परिसरात वारंवार घडत असतात़ या तांत्रिक दोषाकडे विद्युत विभागाचे कर्मचारी, अभियंते दुर्लक्ष करतात़ यात शेतकरी, ग्राहकांसोभतच महावितरणचेही आर्थिक नुकसान होते़ त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालांना पाणी देणे कठीण जाते. ओलिताच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतमाल करपून वाळण्याच्या अवस्थेत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो़ सध्या पिकांना ओलिताच्या पाण्याची अत्यंत गरज आहे़ परंतु पाणी असूनही वीजेअभावी शेतकरी हतबल ठरले आहेत़
या संदर्भात संबंधित शेतकरी मारेगाव, पांढरकवडा येथील महावितरण कार्यालयात गेले. तेथे त्यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यासाठी त्यांनी अनेकदा चकरा मारल्या. तरीही महावितरणचे अधिकारी दखल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर पाठवू म्हणून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. महावितरणच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका मात्र शेतकरी, ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ या नुकसानीला महावितरण जबाबदार नाही का, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)