सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांची पातळी स्थिर
By Admin | Updated: November 2, 2015 01:51 IST2015-11-02T01:51:52+5:302015-11-02T01:51:52+5:30
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे.

सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांची पातळी स्थिर
यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय विहिरी आणि हातपंपांची पाण्याची पातळी चांगली असल्याने पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असे सांगितले जाते.
यवतमाळ लघुसिंचन विभागामार्फत अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. राळेगाव तालुक्याच्या पिंपळगाव या पाणीटंचाईग्रस्त गावात सिमेंटनाला बांध निर्माण करण्यात आला. १८ मीटर लांब आणि एक मीटर उंचीच्या या बंधाऱ्यात पहिल्याच पावसात भरपूर पाणी संचय झाले. बांधकामासह नाला खोलीकरण आणि रूंदीकरणाचेही काम घेण्यात आले. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलच्या पातळीत वाढ झाली.
लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सदर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.व्ही. राठोड, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आदींनी या बंधाऱ्याची पाहणी वेळोवेळी केली. शिवाय नेर तालुक्यातील धुलापूर येथे विनोद गेडाम यांच्या शेतात सिमेंट नाला बांध निर्माण करण्यात आला. यातील पाण्याचा वापर करून ते ओलित करत आहे.
पुसद तालुक्याच्या वडसद येथील बंधाऱ्याविषयी साहेबराव राठोड यांनीही विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले. कळंब तालुक्यात तीन ठिकाणी सिमेंट नाला बांधाचे काम करण्यात आले. याशिवाय उमरखेड, घाटंजी, दारव्हा आदी तालुक्यात बांध बांधण्यात आले. यातून सिंचनासोबतच जलपातळीत वाढ झाली आहे. याविषयीचे शेतकऱ्यांनीही आपले अनुभव मांडले आहे. (वार्ताहर)