दुय्यम निबंधकाच्या अनुपस्थितीने तारांबळ
By Admin | Updated: January 24, 2015 02:02 IST2015-01-24T02:02:11+5:302015-01-24T02:02:11+5:30
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे.

दुय्यम निबंधकाच्या अनुपस्थितीने तारांबळ
वणी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे.
येथील दुय्यम निबंधकांकडे दोन तालुक्यांचा कारभार असल्याचे कार्यालयात उपस्थित आॅपरेटने सांगितले़ वणी उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात़ त्यामुळे नेहमीच या कार्यालयात दिवसभर गर्दी दिसून येते़ तथापि गेल्या आठ दिवसांपासून दुय्यम निबंधक तीन वाजता, पाच वाजता कार्यालयात हजेरी लावत असल्याने केवळ एक-दोनच व्यवहार होत असतात़ त्यामुळे उर्वरित पक्षकार दिवसभर दुय्यम निबंधकाच्या प्रतीक्षेत असतात.
कार्यालयात निबंधक आल्यानंतर कधीकधी नेटवर्कची समस्या निर्माण होते़ त्यामुळे एकही दस्तऐवज नोंदणीकृत होत नाही़ त्यामुळे पक्षकारांना परत जावे लागत आहे़ ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी व इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ दस्तऐवज नोंदणीकरिता या कार्यालयात दाखल होतात. खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना घेणार-देणार व सोबत दोन साक्षदार आणावे लागतात़ परंतु निबंधक दुपारी येत असल्याने एक-दोन व्यवहारच नोंदणीकृत होऊ शकतात. त्यामुळे इतरांना आपला क्रमांक केव्हा येईल, याची प्रतीक्षा लागलेली असते.
यासोबतच दररोज साक्षदार आणणे म्हणजे पक्षकाराच्या खिशाला चुना लागणे आहे़ या कार्यालयामार्फत लाखोंचा महसूल मिळत असूनसुद्धा येथे कायमस्वरूपी निबंधक का नाही, असा प्रश्न पक्षकार उपस्थित करीत आहे़ संबंधित निबंधक यवतमाळवरून ये-जा करतात. अनेकदा त्यांना येण्यास उशीर होतो. तोपर्यंत पक्षकारांना ताटकळत राहावे लागते. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. मात्र ते पायदळी तुडविले जात आहे. येथील दुय्यम निबंधकांनी मुख्यालयी उपस्थित राहावे, अशी पक्षकारांची मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)