बहुतांश गावांत दुहेरी लढती

By Admin | Updated: July 12, 2015 02:36 IST2015-07-12T02:36:05+5:302015-07-12T02:36:05+5:30

वणीसह पांढरकवडा, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Dual fight in most villages | बहुतांश गावांत दुहेरी लढती

बहुतांश गावांत दुहेरी लढती

वणी : वणीसह पांढरकवडा, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चारही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
येत्या २५ जुलैला ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासोबतच काही ठिकाणी रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वणी तालुक्यात सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतींच्या १२९ प्रभागातून ३१८ सदस्य निवडून देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ७२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय वणी तालुक्यात २१ गावांमध्ये २७ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वणी तालुक्यात चार ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध होणार आहे.
पांढरकवडा तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या ३९ प्रभागातून १0४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी २७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय आठ गावांमधील रिक्त असलेल्या आठ जागांसाठी केवळ आठच अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सर्व जागा आता अविरोध विजयी घोषित होणार आहे. मारेगाव तालुक्यात ११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ३३ प्रभागामधून तालुक्यात ८१ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी २0३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय १७ गावांमध्ये २३ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी केवळ आठच अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे १५ जागा पुन्हा रिक्तच राहणार आहे.
झरीजामणी तालुक्यात २६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर चार ग्रामपंचायतींच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ८२ प्रभागातून २१२ सदस्य, तर पोटनिवडणुकीतून सहा सदस्य, असे एकूण २१८ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी तब्बल ४९४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे.
वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी या तालुक्यात जागांच्या प्रमाणात किमान दोन ते अडीच पट अर्ज दाखल झाल्याने बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. काही गावांमध्ये मात्र तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Dual fight in most villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.