पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

By Admin | Updated: May 11, 2017 01:10 IST2017-05-11T01:10:48+5:302017-05-11T01:10:48+5:30

तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे.

Dry water for farming | पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

पाणीटंचाईचे संकेत : पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुसद शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार असतानाच पूस धरणातून उन्हाळी भूईमूगासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पुसदवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. परिणामी पूस धरण पूर्णपणे भरले होते. परंतु या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरण १०० टक्के भरले असतानाही पाणीसाठा हा केवळ ७० टक्केच असतो. ३० टक्केहून अधिक जागा गाळाने व्यापलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकल्पावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाण्याचा उपसा करण्यात येतो. या प्रकल्पातून उन्हाळी भूईमूगासाठी पाणी सोडल्या जात असताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी या पाण्याचा वापर कशासाठी होतो, पाणी वाहून तर जात नाही ना, याची साधी चौकशीही करीत नाही. केवळ कागदी घोडे नाचविली जात आहे.
सध्या पुसद शहराला नियमित एक तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तो जास्तही केला जातो. कोणतेही नियोजन नसतानाही नगरपरिषद प्रशासन मूग गिळून बसले आहे. ज्या भागात केवळ एक तास पाणी मिळतो तो भाग कमी दाबाचा असल्याने अनेकांचे पाणीच होत नाही. त्यामुळे अनेकांना आताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहराला योग्य व नियमित पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच वाया जाणारे व शेतीला वापर होणारे पाणी थांबविणे आवश्यक आहे.
पूस धरणात २० एप्रिल रोजी २६ टक्के जलसाठा होता. ५ मे रोजी २० टक्के तर १० मे रोजी केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहराचे तापमान ४३ अंशांच्या वर गेले असून पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यातच प्रशासन भूईमुगाला पाणी सोडत असल्याने हजारो लिटर पाणी वापरण्याऐवजी नाल्यात वाहून जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. आजही कॅनॉलमध्ये पाणी सोडल्या जात आहे. पाण्याची नासाडी थांबवून योग्य नियोजन न केल्यास पुसदकरांना पाणीटंचाईची झळ बसल्याशिवाय राहणार नाही.

पुसद नगर परिषदेचे नियोजनच नाही
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणातील पाणीसाठा सध्या अत्यल्प आहे. अशातच याच धरणातील पाणी शेतीसाठी अनेकजण वापरत आहे. परंतु अशावेळी नगर परिषद मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेकडून आगामी पाणीटंचाई लक्षात घेता कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

Web Title: Dry water for farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.