Dry the graft to the forest department | सावळी वनविभागाला भ्रष्टाचाराची वाळवी
सावळी वनविभागाला भ्रष्टाचाराची वाळवी

ठळक मुद्देखुलेआम वृक्षतोड : चौकीदारांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

राजेश कुशवाह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील सावळी दक्षिण वन विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली.या क्षेत्रात सुमारे तीन हजार एकरात जंगल पसरलेले आहे. मात्र खुलेआम लाकूड तोड सुरू आहे.
या जंगलात मौल्यवान सागवान वृक्षे आहेत. त्यांची देखरेख करण्यासाठी दोन चौकीदार आहे. वन विभागाच्या रेकॉर्डवर दोन चौकीदार असल्याची नोंद आहे. त्या दोघांचे वेतनही नियमित निघत आहे. मात्र प्रत्यक्षात एकच चौकीदार कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सावळीमध्ये वन विभागाच्या तीन राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड करण्याचे नियोजन होते. या रोपवन लागवडीसाठी मार्च महिन्यात खड्डे करण्यात आले. जून महिन्यात वृक्ष लागवड होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जुलै महिन्यात खड्ड्यात माती भरण्यात आली. त्यात प्रत्यक्षात किती वृक्ष लावण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे.
या वनवृत्तात केवळ निधी हडपण्यासाठी विविध प्रयोग राबिवले जात आहे. खड्ड्यांमध्ये शेणखत, रासायनिक खते भरणे आवश्यक होते. मात्र शेणखत व रासायनिक खत न वापरताच त्याचे बिल काढण्यात आले. अनेक रोजंदारी मजुरांचेही बिल काढले जाते. प्रत्यक्षात कामावर कमी मजूर असतात. केवळ मजुरांची स्वाक्षरी घेऊन पैसे काढले जातात. या दक्षिण वन विभागाच्या परिसरात सागवानाची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. सागवान खुटांचे प्रमाण सतत वाढत आहे. वनअधिकाऱ्यांच्या सहमतीने राजरोसपणे निधी हडपण्याचा प्रकार सुरू आहे.

जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर
या सर्व प्रकाराकडे आरएफओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ते डोळेझाक करीत असल्याने कनिष्ठांना रान मोकळे झाले आहे. परिणामी सावळी वनपरिक्षेत्राचा कारभार राम भरोसे सुरू असल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात जंगलच नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दक्षिण वनवृत्तात तीन ठिकाणी प्रत्येकी दोन चौकीदार आहे. काही ठिकाणी प्रत्येकी एक चौकीदार आहे. नियमानुसारच त्यांचे वेतन काढले जात आहे.
- पवन जाधव
वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्णी

Web Title: Dry the graft to the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.