दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 02:07 IST2015-08-03T02:07:09+5:302015-08-03T02:07:09+5:30

विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले.

Drought-stricken pestle | दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार जलयुक्त

समृद्धीकडे वाटचाल : १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाला बंधारे, गाव टँकरमुक्त
लोकमत शुभवर्तमान
रूपेश उत्तरवार यवतमाळ
विहिरी आटलेल्या. नाले कोरडे ठण्ण पडलेले. गावात टँकरने पाणीपुरवठा. सतत दुष्काळाची छाया. दोन वर्षांपूर्वी असलेले हे चित्र. आता १३ माती बंधारे आणि सात सिमेंट नाले तुडुंब भरलेले. विहिरींनाही मुबलक पाणी. त्यातून आलेली समृद्धी. ही किमया साधली आहे, यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कीटा (कापरा) गावाने. दुष्काळग्रस्त कीटाचे शिवार आता जलयुक्त झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही दीडपट वाढ झाली आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले आदिवासी बहुल कीटा म्हणजे काही वर्षापूर्वी समस्यांचे माहेरघर होते. या गावात कोणत्याच सुविधा नव्हत्या. कामासाठी येथील नागरिकांना यवतमाळकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातील नाल्यावर बांध बांधण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरींचा जलस्रोत वाढला. परिणामी कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. यामुळे गावाने समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. अवघ्या दोन वर्षात झालेला हा बदल गावकऱ्यांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे. आता संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आहे. अल्पपावसाने शेतकरी चिंतेत आहे. मात्र कीटातील शेतकऱ्यांना कसलीच चिंता दिसत नाही. मृद आणि जलसंधारण पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून गावामध्ये माती आणि सिमेंट नाला बांध बांधण्यात आले होते. याठिकाणी मोठा गाळ साचला होता. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला. तसेच काही बांध नव्याने बांधण्यात आले. परिणामी यंदाच्या अल्प पावसातही बंधारे तुडुंब भरले आहे. या बंधाऱ्यांमुळे शेतातील विहिरींचा जलस्तर वाढला आहे. जून महिन्यातील पावसाच्या खंडानंतरही येथील शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे.
शेतशिवार जलयुक्त तर झालेच परंतु यामुळे गाव टँकरमुक्तही झाले आहे. २०१२ पूर्वी या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता गत वर्षीपासून गाव टँकरमुक्त झाले आहे. कधी नव्हे ते ४०० एकर शेती ओलिताखाली आली आहे. एक पीक घेणारे शेतकरी आता दोन ते तीन पीक घेत आहे. मुबलक पाण्यामुळे पिकांचीही वाढ जोमाने होत आहे. यामुळेच शेतकरी आता शेवगा, टरबुज, खरबूज, कोहळे आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे.
तरुणाई वळली जोडधंद्याकडे
कधी काळी कामाच्या शोधात यवतमाळकडे धाव घेणारे येथील तरुण आता जोडधंद्याकडे वळले आहे. शेतीसोबतच त्यांनी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन सुरू केले आहे. शेतात नवनवीन प्रयोग करण्याकडेही या शेतकऱ्यांचा कल असून मलचिंग पेपरचा प्रयोग या गावात शेतकरी करीत असून त्यामुळे तणनियंत्रण होत आहे.
सामूहिक शेतीसाठी पुढाकार
आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकऱ्यांचा गट स्थापन करून शेतकरी बचत करीत आहे. हा प्रयोग कीटा कापरा येथेही सुरू केला जाणार आहे.

Web Title: Drought-stricken pestle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.