३० लाख हेक्टरातील खरीप पिकाचा दगा
By Admin | Updated: October 21, 2014 22:59 IST2014-10-21T22:59:15+5:302014-10-21T22:59:15+5:30
विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ

३० लाख हेक्टरातील खरीप पिकाचा दगा
यवतमाळ : विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न आणि नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी आणि मदत घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे.
यावर्षी विदर्भात पावसाने २५ आॅगस्टला हजेरी लावली. मध्यंतरीच्या काळात वरुणराजा रुसला. १७ सप्टेंबरनंतर पाऊस गायब झाल्याने दुबार-तिबार पेरणी बहुतांश शेतकऱ्यांना करावी लागली. कसेबसे बियाणे उगवल्यानंतर भारनियमनामुळे नुकसान झाले. या सर्व प्रकारात ३० लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले.
सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अडीच हजार खर्च आला. प्रत्यक्ष उत्पादन दोन हजार रुपये होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरल्यानंतर केवळ ८० किलो इतके उत्पादन होत आहे. याशिवाय लागवण आणि मजुरीचा खर्च झाला तो वेगळाच. अनेकांनी सोयाबीनची ही परिस्थिती पाहता त्यात जनावरे सोडणे पसंत केले. अधिकारी मात्र सरकारला यासंदर्भात अंधारात ठेवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
नगदी पीक कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत आहे. २० लाख हेक्टरात कपाशीची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. या पिकाचे उत्पादन एकरी एक ते दोन क्विंटलही होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाला आहे. त्यामळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. दिवाळी सण दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीवर आहे. (वार्ताहर)