दुष्काळाने ग्रामीण व्यवसायांवर संक्रांत
By Admin | Updated: November 29, 2014 02:23 IST2014-11-29T02:23:38+5:302014-11-29T02:23:38+5:30
लांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला.

दुष्काळाने ग्रामीण व्यवसायांवर संक्रांत
स्वप्नील कनवाळे पोफाळी
लांबलेला पाऊस, किडींचे आक्रमण अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. उमरखेड तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. या दुष्काळाचे दुष्परिणाम दिसायला लागले असून ग्रामीण भागातील व्यवसायांवर अवकळा आली आहे. रोजी-रोजी पुरतेही पैसे व्यवसायातून मिळत नसल्याने अनेकांनी शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. लग्नसराईचा हंगामही मंदावल्याचे दिसत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. यावर्षीही खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग हातचे गेले. लावलागवडीचा खर्च तर सोडा मजुरांचे पैसेही घरुन द्यावे लागले. अशा स्थितीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली आहे. कुण्याही शेतकऱ्याच्या हातात पैसे नाही. पैसेच नाही तर खरेदी करताना दहादा विचार करावा लागतो. शेतात काम नसल्याने मजुरांजवळही पैसा दिसत नाही. केवळ शासकीय धान्यावर त्यांची गुजरान सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम ग्रामीण भागातील व्यवसायावर होत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, इस्त्री दुकान यासह गावात येणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसत आहे. सुगीचा हंगाम सुरू झाला की, विविध प्रकारचे विक्रेते गावात साहित्य घेऊन विकायला येतात. परंतु यंदा शेतकऱ्याजवळ पैसेच नसल्याने विक्रेते गावात रिकामे फिरताना दिसत आहे. दोन वेळच्या भोजनाचीही यातून व्यवस्था होत नाही. त्यामुळे अनेकांनी आता शहराकडे धाव घेणे सुरू केले आहे. शेतकरी मात्र आजही रबीच्या आशेवर दिसत आहे. जीवनावश्यक व्यवहार करून गुजरान करीत आहे. अद्यापपर्यंत शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे.
तुळशीचे लग्न झाले की, ग्रामीण भागात लग्न सराईला सुरुवात होते. लग्न म्हटले की मोठा खर्च. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांना रोजगार मिळतो. बँड वाल्यांपासून मंडप डेकोरेशन आणि आचाऱ्यांंंना काम मिळते. परंतु पैसा नसल्याने अनेक जण लग्न पुढे ढकलण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक हातघाईस आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न पडला आहे.