इच्छाशक्तीच्या बळावर केली स्वप्नपूर्ती
By Admin | Updated: July 10, 2014 23:52 IST2014-07-10T23:52:31+5:302014-07-10T23:52:31+5:30
घरात अठराविश्व दारिद्र्य, शेतीचा तुकडा नाही. मोलमजुरी करीत तीनही मुलींचे शिक्षण केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनीही आपल्या जीवाचे रान केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी

इच्छाशक्तीच्या बळावर केली स्वप्नपूर्ती
यवतमाळ : घरात अठराविश्व दारिद्र्य, शेतीचा तुकडा नाही. मोलमजुरी करीत तीनही मुलींचे शिक्षण केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनीही आपल्या जीवाचे रान केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात जबरदस्त यश संपादन केले. वंजारी फैलातील संध्या शांताराम वारे या तरुणीने एमडीमध्ये मुंबई शहरातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिचे हे यश युवा वर्गासाठी प्रेरणास्पद आहे.
यवतमाळातील वंजारी फैलात राहणारे शांताराम देवराव वारे हे मुळचे शेगावचे. रोजगाराच्या शोधात ते १९७० मध्ये यवतमाळात आले. यवतमाळातील वंजारी फैलात ते राहू लागले. दोन रुपये रोज याप्रमाणे टालामध्ये मजुरी केली. पाच वर्षानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी आॅटो घेतला. यातूनच तिनही मुलींना शिक्षण द्यावे, हा ध्यास त्यांनी घेतला. त्यांची पत्नी सरस्वती यांनी मुलींना संस्काराचे धडे दिले. घरातील फरशीवर बाराखडी गिरविण्यात आली. संध्याला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचा ध्यास होता.
शहरातील नगरपरिषदेच्या शाळेत तिचे प्राथमिक शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण महिला महाविद्यालयात घेतले. चाणाक्ष बुद्धीमत्तेमुळे ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायची. वंजारी फैलासारखे उपेक्षित वस्तीत राहून तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथून प्राविण्यासह एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई येथील केईएम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज येथून पॅथालॉजी या विषयात एम.डी. केले. नुकताच एम.डी.चा निकाल लागला. केईएममधून संध्या वारे-नागरगोजे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून मुंबईमधून सुद्धा ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून ती चौथ्या क्रमांकान ेउत्तीर्ण झाल्यामुळे तिच्या या यशाला अनोखी किनार प्राप्त झाली आहे. गरिबीचे चटके सोसत असताना ज्ञानावर मात्र निष्ठा असल्यामुळे संध्याला हे यश प्राप्त करता आले. (शहर प्रतिनिधी)