‘डीआरडीए’ नियामक मंडळ बैठकीत खडाजंगी
By Admin | Updated: July 6, 2016 02:39 IST2016-07-06T02:39:56+5:302016-07-06T02:39:56+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळ बैठकीत मंगळवारी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

‘डीआरडीए’ नियामक मंडळ बैठकीत खडाजंगी
अधिकारी, कर्मचारी रडारवर : ‘उमेद’ कक्षावरही कठोर ताशेरे
यवतमाळ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळ बैठकीत मंगळवारी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विकास कामांत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना रडारवर घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे होत्या. बैठक सुरू झाल्यानंतर काही काळाने खासदार भावना गवळी बैठकीत सहभागी झाल्या. या बैठकीला ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ.फुफाटे आणि खासदार गवळी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून मोठा विकास निधी प्राप्त होतो. या निधीतून जिल्ह्यात विविध विकास कामे केली जातात. मात्र कोट्यवधींचा हा निधी खर्च करताना लोकप्रतिनिधींना विश्वासताच घेतले जात नाही, असा सूर डॉ.फुफाटे आणि खासदार गवळी यांनी आळविला. या निधीतून नेमके कोणते विकास काम केले जाते, कोणते काम कुठे सुरू आहे, याची लोकप्रतिनिधींना माहितीच दिली जात नसल्याचा थेट आरोपच त्यांनी केला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी विविध विकास कामांचे सादरीकरण अत्यंत प्रभावीपणे आणि चतुराईने करतात. जिल्ह्यात अनेक पंचायत समितीअंतर्गत बचत गट स्थापन केल्याचे सांगितले जाते. मात्र नेमके किती बचत गट स्थापन झाले, त्यांना किती कर्ज वाटप झाले, त्यातून किती गटांनी व्यवसाय सुरू केले, त्यांचे कोणते व्यवसाय सुरू आहेत, याबाबत नेमकी माहिती कळत नाही. परिणामी यंत्रणेचे काम व्यवस्थित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींनी या विभागाच्या ‘उमेद’ कक्षावरही कठोर ताशेरे ओढले. या कक्षाचे काम समाधानकारक नसल्याचा सूर त्यांनी काढला. काही गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त पंचायत समितीत सुरू असलेल्या विकास कामांची यावेळी माहिती दिली. बैठकीला अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)