नाट्यगृह बांधकामाचे ‘नाटक’ १५ वर्षांपासून सुरूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:21 IST2018-11-05T21:21:03+5:302018-11-05T21:21:24+5:30
शहरात अद्ययावत नाट्यगृह बांधकामाचे नाटक २००३ पासून सुरू आहे. या नाट्याचा अंक सिव्हिल काम झाल्यानंतर रखडला. सातत्याने आर्थिक चणचण गेल्याने नगरपरिषदेला कामच करता आले नाही. खर्चाचे बजेट आता १० कोटींच्या घरात आहे.

नाट्यगृह बांधकामाचे ‘नाटक’ १५ वर्षांपासून सुरूच !
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात अद्ययावत नाट्यगृह बांधकामाचे नाटक २००३ पासून सुरू आहे. या नाट्याचा अंक सिव्हिल काम झाल्यानंतर रखडला. सातत्याने आर्थिक चणचण गेल्याने नगरपरिषदेला कामच करता आले नाही. खर्चाचे बजेट आता १० कोटींच्या घरात आहे. यवतमाळात जानेवारीत ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही सुवर्ण संधी तब्बल ४५ वर्षानंतर चालून आली. साहित्य संमेलनाला आलेल्या सारस्वतांची पायधूळ नाट्यगृहाला लागावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे. बांधकाम नाट्याचा पडदा लवकर उठला तरच हे शक्य आहे.
राज्यासह देशातील नामवंत साहित्यिकांची ११, १२, १३ जानेवारी असे तीन दिवस यवतमाळात मांदियाळी होणार आहे. अखिल भारतीय स्तरावरचे साहित्य संमेलन असल्याने एकाच वेळी अनेक कार्यक्रम आयोजित आहे. मुख्य कार्यक्रम पोस्टल मैदानात असला तरी साहित्याशी निगडीत अनेक इतर कार्यक्रम एकाच वेळी इतरत्र चालणार आहेत. यामध्ये नगरपरिषदेच्या नाट्यगृहाला योगदान देता येण्याची संधी आहे. साहित्य संमेलनात एकाच वेळी परिसंवाद, ग्रंथदालन, काव्य वाचन, व्याख्यान, मराठी मुशायरा, नवोदित साहित्याचे प्रकाशन असे एक ना अनेक कार्यक्रम होतात. एक हजार आसनक्षमतेच्या नाट्यगृहाची या सोहळ््यामध्ये मोलाची मदत ठरू शकते, ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. फक्त ३० टक्के काम व्हायचे असून त्यासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध आहे. मुबंई येथील आर्किटेक्चर यू. सी. जैन यांनी आराखडा तयार केला आहे. हे नाट्यगृह यवतमाळच्या लौकिकात भर टाकणारेच आहे.
पालिकेचे आता मार्चमध्ये लोकार्पणाचे नियोजन
आता नगपरिषद बांधकाम विभागाने मार्च अखेरपर्यंत नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याचे नियोजित केले असून कामही सुरू आहे. इलेक्ट्रिक सोडून सर्वच कामे सुरू आहेत. किचकट आणि गुंतागुतीचे काम असल्याने त्याला वेळ लागतो. कमीत कमी वेळेत नाट्यगृह पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नगरअभियंता विनायक देशमुख यांनी सांगितले. हेच काम जर अधिक गतीने दोन महिन्यात पूर्ण झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच नाट्यगृहाचा पडदा उठविता येईल.