‘केम’ प्रकल्प घोटाळ्यात ‘डीपीएम’वर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:23 IST2017-09-05T23:23:36+5:302017-09-05T23:23:53+5:30
‘केम’ प्रकल्पातील बहुचर्चित गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावर (डीपीएम) विभागीय महसूल आयुक्तांनी ठपका ठेवला आहे.

‘केम’ प्रकल्प घोटाळ्यात ‘डीपीएम’वर ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘केम’ प्रकल्पातील बहुचर्चित गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकावर (डीपीएम) विभागीय महसूल आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाईचे आदेश १ सप्टेंबर रोजी यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
‘केम’ (कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास) प्रकल्पात एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील दहा कोटींचा खर्च वादाच्या भोवºयात सापडला आहे. त्यातून ब्युटी पार्लर, कौशल्य विकास, पशुधन, प्रशिक्षण, पुस्तक खरेदी आदी उपक्रम राबविले. त्यामध्ये अनियमितता असल्याचे ‘केम’च्या अमरावती कार्यालयाने केलेल्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते.
या प्रकरणात ‘केम’चे तत्कालीन यवतमाळ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रथमदर्शनी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०१६ ते २१ एप्रिल २०१७ या काळात ते येथे कार्यरत होते. २६ आॅगस्ट रोजी अमरावतीमध्ये ‘केम’च्या एकूणच कारभाराचा आढावा घेतला गेला. त्यात दोषींवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून फौजदारीचे निर्देश दिले आहे.
‘डीपीएम’चे अमरावतीच्या ‘एपीडी’कडे बोट
प्रथमदर्शनी दोषी ठरविण्यात आलेल्या तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांनी (डीपीएम) आता अमरावतीच्या तत्कालीन अतिरिक्त प्रकल्प संचालकाकडे (एपीडी) बोट दाखविले आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच आपण कामकाज केल्याचे ते सांगत आहे. तर ‘लोकमत’ने ब्युटी पार्लर प्रशिक्षणावर २८ लाखांचा खर्च हे वृत्त प्रकाशित करताच अमरावतीचे ते अतिरिक्त प्रकल्प संचालक अचानक सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. या पार्लरचे ‘ब्युटी’ कनेक्शन थेट पुण्यात असल्याची चर्चा ‘केम’ प्रकल्पात आहे. थेट आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्याने आता यात किती लोकांना हातकड्या लागतात हे पाहणे महत्वाचे ठरते.