यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे दुहेरी हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:53 IST2020-07-22T14:52:00+5:302020-07-22T14:53:15+5:30
उसनवारीच्या पैशावरून झालेल्या भोसकाभोसकीत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरात घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे दुहेरी हत्याकांड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उसनवारीच्या पैशावरून झालेल्या भोसकाभोसकीत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे येथील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरात घडली. आशिष गायकवाड यांच्या घराच्या शेडमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये विश्वजित प्रकाश बुरबुरे (३०) रा. तिरझडा व वैभव उर्फ डोमा लक्ष्मण राऊत (२७) रा. बाभूळगाव हल्ली मुक्काम कळंब यांचा समावेश आहे. मृत डोमा राऊत हा आशिष गायकवाड यांचेकडे काम करायचा. त्याच्याच घरी त्याचे वास्तव होते. आशिष गायकवाड यांनी विश्वजित बुरबुरे याला ३० हजार रुपये उसनवार दिले होते. पैसे वसुल करण्याचे काम डोमा राऊत करायचा. डोमा राऊत याने विश्वजितकडे पैसे परत करण्याविषयी काही दिवसापासून तगादा लावला होता. याच रागातून विश्वजीत याने पहाटे तीन वाजताच्या सुमारास डोमा राहत असलेल्या आशिष गायकवाड यांचे घर गाठले. तेथे त्याचे धारदार शस्त्राने डोमावर वार करण्यात आले. प्रतिहल्ला चढविण्यासाठी डोमा राऊतने विश्वजितच्या हातातील शस्त्र हिसकाऊन त्याचेवर वार केले.
या झटापटीत दोघेही गंभीर जखमी झाले. विश्वजीत बुरबुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डोमा राऊत याला गंभीर अवस्थेत यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तक्रार मृताचे वडील प्रकाश बुरबुरे यांनी कळंब ठाण्यात दिली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनेची माहिती होताच ठाणेदार विजय राठोड यांनी आपल्या स्टापसह घटनास्थळ गाठले. फॉरेसींग इनव्हेस्टींगेशन टिमने घटनास्थळ गाठून तेथील काही वस्तू ताब्यात घेतल्या. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
उसनवार पैशातून खून- ठाणेदार
आशिष गायकवाड यांनी दिलेल्या व्याजाचे पैसे वसूल करण्याच्या भानगडीत दोघांचा खून झाला. प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहीती ठाणेदार विजय राठोड यांनी दिली.