आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू

By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2025 10:28 IST2025-09-12T10:27:41+5:302025-09-12T10:28:55+5:30

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Don't have demonic ego, culture should also cultivate virtue: Moraribapu | आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू

आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू

-विशाल सोनटक्के, यवतमाळ
आम्हीच स्वयंभू, आमचा ग्रंथ महान, आमचा नायक महान, आमची संस्कृती महान हा अभिमान नव्हे तर आसुरी अहंकार आहे. कोणाच्याही निंदेत रमू नका, द्वेष, ईर्षा बाळगू नका, केवळ संस्कृती महान असून भागणार नाही, तर त्यासोबत सत्कृतीही हवी, असे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारीबापू यांनी गुरुवारी केले.

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याच्या सहाव्या दिवसाची सुरुवात मोरारीबापू यांनी महाराष्ट्राच्या पावनभूमीला प्रणाम करून केली. 

बापू म्हणाले, आचार्य विनोबा भावे यांनी चिंतनातून तीन महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. संस्कृती, सत्ता आणि संपत्ती आसुरी बनल्यास नुकसानकारक ठरतात. संस्कृती हा चांगला शब्द आहे; पण, त्यासोबत सत्कृती असेल तरच. युरोपियन म्हणतात, आमचीच सभ्यता महान, तर आफ्रिकन म्हणतात, आमची संस्कृती महान, विविध धर्मीयही त्यांच्या-त्यांच्या संस्कृतीचे नारे देतात. खरं तर सत्य, प्रेम, करूणा, श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तृप्ती, क्रिया, उन्नती, बुद्धी, स्मृती आणि लज्जा हे सर्व धर्माशी एकत्र यायला हवेत आणि आपल्या वर्तनातही दिसायला हवेत.

जप करताना शत्रुता नसावी

भारत भूमीत भगवान श्रीराम, त्याच काळात दुसरे परशुराम आणि तिसरे द्वारका युगात भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम असे तीन राम झाले. तर कैकयीनंदन भरत, श्रीमद् भागवतचे जडभरत आणि तिसरे कालिदासांच्या शाकुंतलातील शूरवीर भरत असे तीन भरत झाले. तुलसीदास यांनी रामनाम जप करणाऱ्यांना तीन नियम सांगितले आहेत. शोषण करू नये, तो पोषणकर्ता असावा, मनात शत्रुता बाळगू नये आणि त्याने समाजाचा आधार व्हावे, असे म्हटल्याचे मोरारीबापू यांनी सांगितले.

गुरू म्हणजे आत्म्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू : डॉ. विजय दर्डा

सुदामा आणि त्यांचे प्रिय मित्र राजाधीराज कृष्णभेटीने काल माझेही डोळे पाणावल्याचे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा रामकथा पर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी 'तु मुझे छोड कर जा नहीं सकता, छोड इस बात में क्या रखा हैं, वो मिला देगा हमे भी, जिससे आब और गिल को मिला रखा हैं, कई ईक जाल बुना रखा है, आज आसमानोंसे गवाही के लिए एक सितारा बचा रखा है' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तर तो मार्गदर्शक मित्र असून, आत्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Don't have demonic ego, culture should also cultivate virtue: Moraribapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.