नागरिकांची कामे तत्परतेने करा

By Admin | Updated: February 10, 2016 03:11 IST2016-02-10T03:11:37+5:302016-02-10T03:11:37+5:30

प्रशासनाबाहेर असताना प्रशासनाकडून जनतेची गैरसोय होत असल्याबद्दल आपण नेहमीच टीका करतो.

Do the tasks of the citizens promptly | नागरिकांची कामे तत्परतेने करा

नागरिकांची कामे तत्परतेने करा

सचिंद्र प्रताप सिंह : कोषागार कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिर
यवतमाळ : प्रशासनाबाहेर असताना प्रशासनाकडून जनतेची गैरसोय होत असल्याबद्दल आपण नेहमीच टीका करतो. मात्र प्रशासनात सहभागी झाल्यानंतर त्याच व्यवस्थेचा आपणही कणा बनतो. त्यानंतर त्या टीका आपल्याला निरर्थक वाटायला लागतात. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून कुठलाही त्रास न होता सहजरित्या त्यांची कामे निकाली निघाली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.
बचत भवन येथे लेखा व कोषागारे दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भोंडे, स्थानिक लेखाचे सहायक संचालक प्रशांत ढाबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी नागरिकांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमीच कर्तव्यरत राहिले पाहिजे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृत्तीवेतन प्रदान करीत असल्याबद्दल कोषागार कार्यालयाचे अभिनंदन केले. कोषागार अधिकारी ज्योती भोंडे यांनी वित्त विभागाची भूमिका विषद केली.
लेखा व कोषागारे दिनानिमित्त सकाळच्या सत्रात कोषागार कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच रांगोळी, डिश डेकोरेशन स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
रक्तदान शिबिरात ३१ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मारोती कुचनकर व त्यांची चमू उपस्थित होती.
सायंकाळी बचत भवन येथेच सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळीही जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांनी गीतगायन व नृत्य सादर केले. प्रास्ताविक कोषागार अधिकारी ज्योती भोंडे यांनी केले. तर आभार प्रमोद पोहकार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Do the tasks of the citizens promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.