लहान मुलांचा साधा तापही अंगावर काढू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:07+5:30
मुलांच्या बाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, जेणे करून गंभीर धोका टाळता येतो. मागील तीन महिन्यांत कुटुंबातील व्यक्ती पाॅझिटिव्ह येऊन गेली अशा कुटुंबातील मुलाला जोराचा ताप आला असेल तर त्याची अँटिबाॅडी तपासणी करणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला कोरोना होऊन गेला की काय याचे निदान होते.

लहान मुलांचा साधा तापही अंगावर काढू नका !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे म्हणून उलटी, पातळ संडास हे मानले जात होते. आता मात्र अचानक आलेला तापही धोक्याचा ठरू शकतो. संभाव्य तिसरी लाट जिल्ह्यात अजून दाखल झालेली नाही. मुलांच्या बाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, जेणे करून गंभीर धोका टाळता येतो. मागील तीन महिन्यांत कुटुंबातील व्यक्ती पाॅझिटिव्ह येऊन गेली अशा कुटुंबातील मुलाला जोराचा ताप आला असेल तर त्याची अँटिबाॅडी तपासणी करणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला कोरोना होऊन गेला की काय याचे निदान होते. पाॅझिटिव्ह असताना बरेचदा कोरोनाचे निदान होत नाही. लक्षणानुसार उपचार होतात.
सर्दी, खोकला, तापाची साथ
सर्दी व खोकला हा आजार मानला जात नव्हता. मुलांना घरगुती उपचार करूनच बरे केले जात होते. काही दिवसानंतर आराम न पडल्यास डाॅक्टरांकडे नेण्यात येत होते. ही बाब आता धोकादायक आहे. वेळीच योग्य उपचार घेणे गरजेचे झाले आहे.
बालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर
बालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर तयार केले आहे. पीसीसीमध्ये ४० बेड, पीआयसीयूमध्ये ३९ बेड, कुपोषित बालकांसाठी ६ बेड आरक्षित ठेवले आहे. याशिवाय खासगी बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्तरावरही बालकांच्या उपचाराची व्यवस्था केली आहे.
ताप आला म्हणजे कोरोना झाला असे नाही...
- ताप आला म्हणजे कोरोना होय असे नाही. मात्र योग्य डाॅक्टरांचा सल्ला घेवून सर्दी, ताप, खोकला याचा उपचार करणे गरजेचे आहे.
- बरेचदा डाॅक्टर कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यविषयक माहितीवरून उपचाराची दिशा ठरवितात. त्यामुळे गफलत होत नाही.
- सर्दी, तापापेक्षाही सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. मुलांमध्ये डेंग्यूची साथ दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क असणे आवश्यक आहे.
घाबरू नका, काळजी घ्या
कोरोनाची संभाव्य लाट येणार आहे. याची धास्ती घेणे चुकीचे आहे. सतर्क राहून व काळजी घेवून आपण मुलांना यापासून सुरक्षित ठेवू शकतो. साधे आजारपणही आता दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
- डाॅ. अजय केशवाणी, बालरोगतज्ज्ञ